जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात घराच्या छतावरून पडून शेतकऱ्याचा मुत्यू झाला. अनिल प्रभाकर शिंदे (वय ३२) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. बावनापांगरी गावात ही घटना घडली. घराच्या छतावरुन पडल्यानंतर अनिल याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनिल घराच्या छतावर झोपण्यासाठी गेला होता. जोराचा वारा सुटल्यामुळे छतावरून खाली उतरत असताना हा अपघात झाला. वीज प्रवाह खंडित झाला असल्यामूळे खाली उतरताना त्यांना छताचा अंदाज आला नसल्याने तरुण जमीनीवर कोसळला.  सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर अनिलला तात्काळ उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.