तूर विक्रीनंतरही पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परवड

बाजारात विकलेल्या तुरीच्या भरवशावर म्हैस खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला पैसेच न मिळाल्याने पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवावे लागल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद तालुक्यात घडली. बाजारात तुरी आणि म्हैस पडली भारी, अशी वेळ तूर खरेदी केंद्राच्या मनमानी कारभारामुळे उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा गावातील शेतकऱ्यावर आली आहे. अर्धागवायूमुळे अस्थिपंजर अवस्थेत पडून असलेले वडील, आठ जणांचा कुटुंबकबिला. त्यात केवळ साडेचार क्विंटल तुरीचे उत्पन्न आणि तेही तूर खरेदी केंद्राकडे मागील दोन महिन्यांपासून अडकले आहे.

सचिन देवीदास बुर्ली या तरुण शेतकऱ्याने २० हजार रुपयांमध्ये म्हैस खरेदी केली. साडेचार क्विंटल तूर केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या कंपनीला वडिलांच्या नावे विकली होती. त्यापोटी २३ हजार रुपये मिळणार होते. महिनाभराचा वायदा करून म्हैस खरेदी केली. मात्र तुरीचे पसे मिळालेच नाहीत. परिणामी, बायकोच्या गळय़ातील दीड तोळे सोने सचिन बुर्ली यांनी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत गहाण ठेवले आणि २४ हजार रुपयांचे कर्ज घेतले. म्हशीचा व्यवहार मिटवला आणि उरलेल्या चार हजारांतून वडिलांच्या औषधोपचाराचा आणि इतर कौटुंबिक गरजांचा खर्च भागवला. शेतकऱ्यांना हक्काचा हमीभाव मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या मेंढा केंद्रातून दोन महिने उलटून गेले तरीदेखील बुर्ली यांना अद्याप पसे मिळालेले नाहीत.

राज्यात ११७ तूर खरेदी केंद्रे आहेत. पकी उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २४ केंद्रांमधून खरेदी करण्यात आली आहे. बहुतेक केंद्रांतून शेतकऱ्यांची देयके अद्याप चुकती करण्यात आलेली नाहीत. केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत एसएफएसी या नोडल एजन्सीला तूर खरेदीचा परवाना देण्यात आला आहे. त्यांनी जिल्हास्तरावर शेतकऱ्यांच्या कंपन्यांना खरेदी केंद्र सुरू करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत तूर खरेदी केंद्राच्या या ‘कंपनीराज’ला आता शेतकरी वैतागले आहे. याच गावातील रामप्रसाद मोटे यांचे एक लाख ८१ हजार रुपये तूर खरेदी केंद्र संचालकाकडे दोन महिन्यांपासून अडकले आहेत.

सहकारमंत्री, विरोधी पक्षनेते आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही टेकले हात सुंभा गावातील शेतकऱ्यांनी उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी या केंद्राशी आमचा संबंध नाही, असे म्हणून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासच नकार दिला. शेतकऱ्यांनी तडक सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सहकारमंत्रीदेखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीच करू शकले नाहीत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना फोनवरून संपर्क साधला. सभागृहात त्यासाठीच आम्ही लढत आहोत, असे सांगून त्यांनीही फोन खाली ठेवला. शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूर खरेदी करणाऱ्या केंद्र सरकारपुरस्कृत या कंपन्यांवर नेमके नियंत्रण आहे तरी कोणाचे, हा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपये अद्यापही या कंपन्यांकडे अडकून आहेत.