गेला दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आज महाराष्ट्रीय बेंदुर साजरा करण्यात शेतकऱ्यांचा उत्साह दिसला नाही. ग्रामीण भागात कृषी संस्कृतीशी निगडित असलेला हा सण कोणताही डामडौल न करता केवळ औपचारिकपणे पार पडला. घरोघरी चिखलाच्या बलाची पूजा करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांचा सखा असणाऱ्या बलांना वाजत काढण्याची परंपरा बऱ्याच गावात यंदा दुष्काळी स्थितीमुळे खंडित झाली.
आषाढी पौर्णिमेला सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून शेती व्यवसायातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या बलाला ओढय़ाच्या पुरात न्हाऊ घालून घरी आणले जाते. घरी आल्यानंतर बलांची पूजा करून पुरणपोळीचा नवेद्य देण्यात येतो. त्यानंतर दुपारी या बलांची िशगे रंगवून झुली घालण्यात येतात. या बलांना सुशोभित करून वाद्याच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येते. मिरवणूक करून घरी आल्यानंतर शेतकऱ्याची घरधनीण बलांना पंचारतीने ओवाळते. मिरवणूक गावच्या वेशीतून येत असताना मानाच्या घराण्यातील बलाकडून कर तोडण्याचा विधीही पार पाडला जातो.
यंदा मात्र पावसाने गेल्या दीड महिन्यापासून दडी मारल्याने बेंदराच्या सणावर दुष्काळाचे सावट दिसून आले. कोणताही डामडौल न करता सणाची औपचारिकता पार पाडण्यात आली. बेंदराच्या सणात गावच्या ओढय़ाला पूर आलेला असतो. मात्र यंदा ओढय़ाऐवजी चावीच्या पाण्याने बलाला अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर पूजेची औपचारिकता पार पाडण्यात आली.
मिरज शहरात मात्र काही हौशी शेतकऱ्यांनी शहरातील बुधवार पेठ, शास्त्री चौक येथून बलांची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत नदीवेस परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे २३ बल सहभागी करण्यात आले होते.