महागाव तालुक्यातील मुडाणा येथील शेतकरी प्रकाश पाटील यांचा मुलगा श्रीकांत नुकत्याच घेण्यात आलेल्या एम.एस्सी.(बॉटनी) परीक्षेत ९९ टक्के गुण घेऊन अमरावती विभागातून पहिला आला आहे. अंगी जिद्द चिकाटी आणि आईवडिलांचा आशीर्वाद असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे त्याने यशातून दाखवले आहे. या यशाबद्दल १८ फेब्रुवारीला अमरावती विद्यापीठात राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, गुरुजन व मित्रमंडळींना दिले आहे. श्रीकांतने पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच निजधाम विद्यालयात घेतले. पुढील शिक्षण पुसद, औरंगाबाद व अमरावती येथे पूर्ण केले. श्रीकांतने नेट-सेट परीक्षा दिली असून वनस्पतीशास्त्रात पीएच.डी. करण्याचा त्याचा मानस आहे.