बी-बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसेच नसल्याने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्याने दगड पेरणी करून सरकारचा निषेध नोंदवला आहे. बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातल्या खुटपुरी गावात राहणाऱ्या गोपाळ काकडे या शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले आहे. दगडांच्या पेरणीनंतर निघणारे पीक सरकारला विकण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

राज्य सरकारने अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. तसेच कर्जमाफीची अंमलबजावणी होत नाही तोवर १० हजार रूपये  देण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र आजवर एकही पैसा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी दगड पेरण्याची भूमिका घेतली आहे. खरीप हंगामाला सुरूवात झाली आहे, शेतीची मशागतही झालीये. मात्र बी-बियाणे घेण्यासाठी, तसेच खते घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसेच नाहीत. त्यामुळे शेतात दगड आणि रेती पेरून शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. यामधून जे उगवेल ते आम्ही सरकारला विकणार आहोत असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारचा निषेध केला आहे. या आंदोलनात श्रीकृष्ण काकडे, विष्णू जुमळे, स्वाती काकडे, ममता काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.

शेतकऱ्यांनी आपल्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे केले. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला यशही आले. गेल्या रविवारीच सरकातर्फे आंदोलन चिघळू नये म्हणून अल्प भू धारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही जाहीर करण्यात आली. असे असले तरीही दिव्याखाली अंधार अशीच स्थिती महाराष्ट्रात दिसते आहे. कारण शेतकऱ्यांकडे खते, बी बियाणे घेण्यासाठी, पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याचे वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे.

कर्जमाफीची घोषणा तर झाली, तसेच जोवर अंमलबजावणी होत नाही तोवर प्रति महिना १० हजार देण्याचीही घोषणा केली. तरीही ज्या शेतकऱ्याला पेरणी करायची आहे त्याच्यावर मात्र दगड पेरण्याची वेळ आलीये.