गडचिरोली जिल्ह्य़ातील शेतकरी कुटुंबाचा भीषण कर्जफेरा

कर्जाचा विळखा माणसाला कसा आयुष्यातून उठवतो आणि नियती कशी कुटुंबीयांकडून चक्रवाढ व्याज वसूल करते, याचा प्रत्यय कोरची तालुक्यातील जामनारा येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आला. ज्या जमिनीसाठी त्याने आत्महत्या केली तीच जमीन शवविच्छेदन व अंत्यसंस्कारासाठी सावकाराकडे पाच हजारात गहाण ठेवावी लागल्याने सारेच सुन्न झाले आहेत.

जामनारा येथील मेहरूराम सुंदरसिंह पोरेटी या ५० वर्षीय अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून २४ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मेहरूरामने आपली सुटका करून घेतली, पण त्याच्या कुटुंबीयांचे जगणे मात्र बिघडून गेले आहे. मेहरूराम पोरेटी हा मुलेटीपदीकसा येथील मूळ रहिवासी. जामनारा येथील सनकू कोडापे यांची मुलगी सिरकोबाईशी २० वषार्ंपूर्वी त्याचा विवाह झाला तेव्हापासून तो घरजावई होता.  सिरकोबाईच्या नावावरील ९७ आर. जागेवरच मेहरूरामचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, गेल्या तीन वषार्ंपासून तो नापिकीने त्रस्त होता. त्यामुळे जाणवणारी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी सासरे सनकू कोडापे यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेकडून १४ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातच मेहरूरामला मुलाचे लग्न उरकावे लागले. याच सुमारास सासऱ्यांचही निधन झाले. आता त्यांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मेहरूरामवर आली, परंतु नापिकीमुळे ते शक्य होत नव्हते. त्यामुळे घरात कटकटी सुरू झाल्या आणि २४ मे च्या रात्री मेहरूरामने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्याचा मृतदेह कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, परंतु तेथे तीन महिन्यांपासून डॉक्टरच नसल्याने शवविच्छेदन न होऊ शकल्यामुळे कुटुंबीयांना मेहरूरामचे पार्थिव कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. २६ मे ची सकाळ उगवली. मेहरूरामचे कुटुंबीय त्याचा मृतदेह कुरखेडय़ाला नेण्यासाठी धडपडत होते. त्यांनी एका चारचाकी वाहन मालकास विचारल्यावर त्याने कोरची ते कुरखेडय़ापर्यंतच्या ३० किलोमीटरचे भाडे ३ हजार रुपये सांगितल्यावर त्यांचे अवसान गळाले. कारण, ते पैसे त्यांच्याजवळ नव्हते. शवविच्छेदन करणे गरजेचे होते. मग विषय पुन्हा जमिनीवरच आला. ज्या जमिनीमुळे मेहरूरामचा जीव गेला तीच जमीन त्याच्याच अंत्यसंस्कारासाठी सिरकोबाईने एका इसमाकडे गहाण ठेवून ५ हजाराचे कर्ज घेतले आणि या पैशातून मेहरूरामचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार केले. कर्जामुळेच मेहरूरामला मरण आले आणि मरणामुळे त्याच्या कुटुंबीयांवर पुन्हा कर्जाचा डोंगर झालेला आहे. आता मेहरूरामचे कुटुंब पुन्हा सावकारी कर्जफेऱ्यात अडकले आहे.