राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. पूर्णा तालुक्यात फुलकळस येथील शेतकरी नारायण गुणाजी शिराळे (वय ३०) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. कर्जबाजारी व नापिकीच्या कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची जिल्ह्यातील ही ५३ वी घटना आहे. बँक व खासगी सावकाराचे कर्ज, सोयाबीन व कापसाचे पीक वाया गेल्याची चिंता, जनावरांच्या वैरणीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांना घेरले आहे.
फुलकळस येथील नारायण गुणाजी शिराळे व त्यांचा लहान भाऊ विठ्ठल हे दोघे एकत्र राहतात. त्यांच्याकडे सोळा एकर कोरडवाहू शेती आहे. या वर्षी शेतात कापूस व सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु खर्चाइतपतही उत्पन्न मिळाले नाही. तसेच दोघा भावांकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक व इंडिया बँकेचे प्रत्येकी दीड लाख रुपये असे एकूण तीन लाखांचे कर्ज होते. सध्या जनावरांना चारा नसल्याने नारायण हा गेल्या आठ दिवसांपासून अस्वस्थ होता. शुक्रवारी सायंकाळी त्याने शेतामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपविले. शिराळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आई व भाऊ असा परिवार आहे.