बार्शी तालुक्यात कारी येथे एका शेतकऱ्याने नापिकी व सहा लाखांच्या कर्जाचे ओझे सहन होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
राजाभाऊ मच्छिंद्र चौधरी (४०) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. यासंदर्भात चौधरी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार कारी गावच्या शिवारात चौधरी यांची चार एकर जिरायत शेतजमीन आहे. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. शेती विकसित करण्यासाठी राजाभाऊ चौधरी यांनी काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीयकृत बँकेकडून सहा लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु, अवकाळी पाऊस आणि काही प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेत नापीक झाले. त्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या राजाभाऊ चौधरी यांनी घरात छताला केबल वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत. या घटनेची पांगरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.