पुराचे पाणी घुसल्याने घर पडले. त्यातच सरकारच्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीच्या १ लाख रुपये रकमेच्या वसुलीची नोटीस मिळाल्याने हताश झालेल्या नेवासे (जिल्हा नगर) येथील पोपट चंद्रभान भालेराव (वय ३८) या कर्जबाजारी दलित शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अन्यथा माझ्यासारखीच त्यांच्यावरही वेळ येईल असे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
पाऊस नाही, पाणी नाही त्यामुळे पैसेही नाही. पैसे आणायचे कोठून असा प्रश्न भालेराव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. ज्या ठेकेदाराच्या चुकीमुळे घर पडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला माझ्या आत्महत्येस जबाबदार धरावे, त्याचप्रमाणे आता सरकारच्या सबलीकरण योजनेचे पैसे देता येत नाही, खादी ग्रामोद्योग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे थकीत कर्ज तरी आता माफ करावे अशी विनंतीही त्यांनी केंद्र व राज्य सरकारला केली आहे.
नेवासे गावातील गंगानगर भागात भालेराव हे दलित समाजातील शेतकरी राहतात. त्यांना राज्य सरकारच्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत लक्ष्मीनगर भागात २ एकर जमीन मिळाली. या जमिनीचा पहिला १ लाख रुपयाचा हप्ता भरण्याची नोटीस त्यांना नुकतीच मिळाली होती. सप्टेंबरमध्ये ओढय़ाला आलेल्या पुरामुळे त्याचे घर पडले होते. बाजार समितीलगत ओढय़ावर तीर्थक्षेत्र विकास योजनेतून होत असलेल्या नवीन पुलाच्या निकृष्ट कामामुळे गावात पाणी शिरले होते. त्यातच यंदा पुरेसा पाऊस नव्हता. खरीपाचे पीक आले नाही. त्यामुळे भालेराव हे त्रस्त झाले होते. त्यांच्याकडे खादी ग्रामोद्योग व आण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज होते.
ओढय़ाला पूर येण्यास जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी, पडलेले घर सरकारने बांधून द्यावे, माझ्या नावावरील कर्ज माफ करुन कुटुंबाला आर्थिक मदत करावी, सरकारचे लोकांकडे लक्ष नाही लोक सरकारला कंटाळले आहेत आतातरी सरकारला जाग येईल का, असा सवाल त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधीक तपास करीत आहेत. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तहसीलदार हेमलता बढे यांची भेट घेऊन भालेराव यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.