राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुरनूर गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर दुसऱयाच दिवशी याच गावातील एका शेतकऱयाने कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली.
अशोक इंडे (४३) असे आत्महत्या केलेल्या या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्या घरात छताच्या लोखंडी पट्टीला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. ही घटना घडल्यानंतर नातेवाईक व गावक-यांनी पोलिसांना माहिती न कळविता मृत अशोक इंडे याच्या पार्थिवाचा परस्पर अंत्यविधी उरकला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक इंडे यांच्या शेतात यंदा पावसाअभावी पीक घेता आले नाही. नापिकीमुळे अर्थगाडा चालविणे जिकिरीचे झाले असतानाच डोक्यावरील कर्जाचा डोंगरही वाढत होता. त्यातूनच वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारीच इंडे यांच्या कुरनूर भागाला भेट देऊन तेथील कोरडा पडलेल्या कुरनूर धरणाची पाहणी केली होती. स्थानिक शेतकऱ्यांशी संवादही साधला होता. त्यानंतर दुसऱ्याच  गावातील शेतकऱ्याने कर्जाच्या थकबाकीमुळे आत्महत्या केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.