लासलगावच्या कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी शीतगृह उभारणीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बोलत असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे शीतगृह उभारणीचा कार्यक्रम तापल्याचं चित्र दिसून आलं. समृद्धी महामार्गावरून घोषणाबाजी सुरू केल्यानं शीतगृह भूमिपूजनाच्या कार्यक्रमात वाद ओढवला. मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर शेतकरी शांत झाले.

खरंतर लासलगावचा कांदा हसवतो आणि रडवतोही, कांद्याचे दर पडले तर शेतकरी आम्हाला जाब विचारतात आणि वाढले तर माध्यमं जाब विचारतात त्यामुळेच कांद्यासाठी शीतगृह बांधण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हटले होते, मात्र ते भाषण करत असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लासलगावच्या शेतकऱ्यांचा काहीसा रोषच मुख्यमंत्र्यांना पत्करावा लागला.  शेतकऱ्यांना शांत करून मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.

मुख्यमंत्री भाषणात काय म्हटले?

लासलगाव खरेदी विक्री संघ आणि भारतीय रेल्वे यांच्या पुढाकारानं बहुउद्देशीय शीतगृह उभारण्यात येणार आहे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. शीतगृह उभारल्यानं कांदा वाया जाणार नाही, तसंच कांदा उत्पादकांच्या शेतमालाला भाव मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. शीतगृह भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आपण आत्ता आहोत मात्र महिन्याभरापूर्वी मी याचा प्रस्ताव रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे विमान प्रवासादरम्यान मांडला होता. त्यावेळी तुम्ही सांगा कांद्यासाठी काय करायचं आहे आपण त्यावर तातडीनं निर्णय घेऊ असं आश्वासन सुरेश प्रभू यांनी दिलं. इथली सगळी परिस्थिती सांगताच सुरेश प्रभू यांनी आम्हाला तातडीनं मदतीचं आश्वासन दिलं.

कांद्याची बाजारपेठ ही शेतकऱ्यांच्या हाती असली पाहिजे हेच आमचं मत आहे, आपला शेतमाल शेतकऱ्याला योग्य वेळी विकता आला पाहिजे, त्याचमुळे त्याला शेतमालाची साठवणही करता आली पाहिजे, ज्यामुळे कांदा, भाजीपाला, फळं जास्त भाव मिळेल तिथे विकण्याला मदत होईल यासाठी व्यवस्था करा अशी मागणी मी सुरेश प्रभू यांच्याकडे केली.

या मागणीनंतर विमानातूनच सुरेश प्रभू यांनी अमेरिकेत कॉनकॉरच्या सीएमडीना फोन केला आणि लासलगावमध्ये रेल्वेतर्फे शीतगृह उभारलं गेलं पाहिजे असं प्रभू यांनी त्यांना सांगितलं. यानंतर मुख्यमंत्री कार्यलयात त्यांचा फॅक्स आला आणि त्यांनी मला शीतगृहाच्या भूमिपूजनासाठी आज इथे बोलावलं आहे. एक महिन्याच्या आत त्यांनी ही सगळी प्रक्रिया केली याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

शीतगृह उभारल्यानंतर काय होणार?
साडेतीन एकर जागेत अडीच हजार मेट्रिक टन क्षमतेच्या शीतगृहाची उभारणी

दीड हजार मेट्रिक टन कांदा आणि एक हजार मेट्रिक टन फळे आणि भाजीपाला साठवता येणार

या व्यवस्थेमुळे कृषिमाल निर्यातीला चालना मिळणार

शीतगृहात कांद्याची साठवणूक करणे अवघड असल्याचं मत या क्षेत्रातले काही जाणकार आणि संशोधक व्यक्त करत आहेत. मात्र कृषिमाल आणि खासकरून कांद्याला योग्य दर मिळाले पाहिजेत आणि हा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात साठवला गेला पाहिजे म्हणून आम्ही शीतगृहांची साखळी उभारत आहोत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.