पाणी आणण्यासाठी विहीरीवर गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या ठिकाणी घडली आहे. साहेबराव बारवकर असे या ७५ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. बोलठाण येथील नांदगाव रोड जवळील शिवारात राहणारे साहेबराव बारवकर हे पाणी आणण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या शेतातील विहिरीत पाणी नसल्याने शेजारच्यांच्या शेतातील शेतात असलेल्या विहिरीत ते पाणी आणण्यासाठी गेले. या विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक यांच्या मदतीने साहेबरावांचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी नांदगाव येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात साहेबरावांच्या पार्थिवावर अंत्यसंसकार करण्यात आले. साहेबरावांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असे कुटुंब आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.