यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर फवारण्यात येणाऱ्या औषधामुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवल्याच्या घटना ताज्या असतानाच त्याचे लोण संगमनेरमध्येही पोहोचले आहे. योग्य ती खबरदारी घेऊनही डाळिंबाच्या बागेत तणनाशकाची फवारणी केल्यानंतर विषारी औषधाचा काही अंश शरीरात गेल्याने एक तरुण शेतकरी अत्यवस्थ झाला आहे.

तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील शशिकांत शंकर रोकडे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रोकडे यांनी मोठय़ा कष्टाने रानमाळावर डाळिंबाची शेती फुलविली आहे. अलिकडेच झालेल्या पावसाने डाळिंबाच्या बागेत मोठय़ा प्रमाणावर तण उगवले होते. ते नष्ट करण्यासाठी त्यांनी घारगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून तणनाशक आणले होते. २१ सप्टेंबरला तणनाशकाची खरेदी करून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते फवारणीसाठी रोकडे डाळिंबाच्या बागेत गेले. औषधाचा अपाय होऊ नये म्हणून त्यांनी डोळ्याला चष्मा, पायात गमबूट, तोंडाला मास्क लावून योग्य ती खबरदारीही घेतली होती. असे असतानाही विषारी औषधाचा काही अंश त्यांच्या श्वसनातून गेला. परिणामी त्यांच्या नाकाची आग होऊ लागली. दुसऱ्या दिवशी त्रासात वाढ होऊन श्वसन करताना अडथळा निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना घारगावच्या एका दवाखान्यात नेले. मात्र नाकातून दुर्गंधी येणारे पाणी वाहू लागल्याने त्यांना तत्काळ संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आठवडाभर उपचार घेऊन पुढील उपचारासाठी ते एका श्वसनरोग तज्ज्ञाकडे दाखल झाले.

दरम्यान रोकडे यांच्यावर प्रारंभी उपचार करणाऱ्या संगमनेरातील डॉक्टरांकडे चौकशी केली असता, औषध फवारणीमुळे श्वसनाला त्रास होत असल्याचे सांगत रोकडे आपल्या दवाखान्यात दाखल होते. त्यांच्यावर साधारण आठवडाभर उपचार करण्यात आले. तब्येत ठीक झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतरही ते एकदा पुन्हा तपासणी करण्यास आले तेव्हाही तब्येत ठीक होती.  याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांच्याशी मोबाइलवर संपर्क केला असता त्यांनी प्रथम फोन उचलला नाही व नंतर बंद करून ठेवला.