उद्धव ठाकरे यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला सुनावले

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना जागेवर तर ठेवणार नाहीच शिवाय त्यांचा कोणी अपमान करत असेल तर पायातील वहाणेने मारू, असे  शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला सुनावले. सत्तेची नव्हे तर लोकांची पर्वा असल्याने सरकारवर दबाव ठेवणारच असा इशारा त्यांनी दिला.

शेतकरी संपाचा निर्णय घेऊन ऐतिहासिक लढा उभारल्याबद्दल आज पुणतांबे (ता.राहता) येथे ठाकरे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचा सत्कार केला. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम, मंत्री दादा भुसे, खासदार विनायक राऊत, अनिल कदम, माजी आमदार अनिल राठोड, संपर्कनेते सुहास सामंत, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे आदी उपस्थित होते.

ठाकरे यांनी आज भाजपाबरोबरच, काँग्रेस, राष्ट्रवादीला चांगलेच सुनावले. कर्जमुक्तीचा निर्णय झाल्यावर आता अनेक जण ढोल वाजवायला लागले आहेत. पण त्यांचा आवाज त्यावेळी कोठे गेला होता. खरे तर पुणतांबेकरांनी इतिहास घडविला. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला. शेतकरी चिडले होते तेव्हा कुणी आवाज काढत नव्हते. पण कर्तव्य म्हणून पाठिंबा दिला. आंदोलनामागे राजकीय पक्षाचा हात आहे असे फडणवीस यांनी सांगितले. तेव्हा शिवसेना आंदोलनामागे आहे हे आम्ही जाहीर केले. आम्ही लाजत, मुरडत कुणाला पाठिंबा देत नाही. पाठीमागून वार करत नाही. समोरून छाताडावर वार करतो. शिवसेना प्रमुखांची तशी शिकवण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या!

शेतकरी संपादरम्यान आंदोलकांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कलमे लावून कारवाई करण्यात आली. हे गुन्हे मागे घेण्यास आम्ही भाग पाडणार असून त्याशिवाय गप्प बसणार नाही. गुन्हे मागे न घेतल्यास शिवसेना आहे आणि सरकार आहे, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शेतकऱ्यांना जर गुन्हेगार ठरवणार असाल तर, या गुन्हेगारांबरोबरच सेना आहे. गुन्हे मागे न घेतल्यास दणका दाखवू असे ठणकावले. पिंपळगाव येथील आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची यादीच सभेत ठाकरे यांनी मागवली. ही यादी सरकारकडून रद्द करून घेणारच, असा दिलासाही त्यांनी दिला.