शेतकरी आंदोलन हक्क समितीची टीका

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणी मृत्यूच्या वास्तावाची कारणे शोधण्यासाठी राज्याच्या गृहविभागाचे सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी यवतमाळ जिल्ह्य़ाला भेट देऊन सरकारला सादर केलेला अहवाल अवास्तव असल्याची टीका शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीमुळे १९ शेतकऱ्यांचे बळी गेले आणि आता हा आकडा २२ पर्यंत पोचला आहे. शेकडो शेतकरी, शेतमजूर उघडय़ावर आले आहेत. त्यांना मदत न करता मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेतकऱ्यांवरच ढकलून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी केला.

वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा वाघाच्या हल्ल्यात कोणी ठार झाले तर जबाबदारी संबंधित व्यक्तीची आहे असे म्हणून सरकार हात झटकून टाकेल. वाघ आहे त्या परिसरात कशाला गेला असा सवाल करत सरकार जबाबदारी टाळणार आहे काय? असाही प्रश्न त्यांनी केला.