शेकापच्या मावळ आणि रायगड मतदारसंघातील उमेदवारांनी जेष्ठ काँग्रेस नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन्ही उमेदवारांना अंतुले यांनी आशीर्वाद दिले असल्याचे सांगत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये असलेले मतभेद चव्हाटय़ावर आणले आहेत.
येथील पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी हा खुलासा केला. शेकापचे मावळ मतदार संघातील उमेदवार लक्ष्मण जगताप आणि रायगड मतदारसंघातील रमेश कदम यांना घेऊन आपण बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेलो होतो. दोन्ही उमेदवारांनी अंतुले यांची भेट घेतली, या दोघांनाही अंतुले यांनी पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिला, विविध मुद्दय़ांवर त्यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील मतभेद या भेटीमुळे उघड झाले आहेत. याआधीही रायगडचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याबद्दल अंतुले यांनी नाराजी व्यक्त केली होती. अंतुलेंच्या आदेशानंतरच राष्ट्रवादीचे काम करण्याची अट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घातली होती. या पाश्र्वभूमीवर अंतुले यांनी शेकाप उमेदवारांना आशीर्वाद दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
अंतुले यांनी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळणे बाकी आहे. रायगड मतदारसंघातील राजकारण आता तीन जण ठरवतील. त्यात जयंत पाटील, रमेश कदम व आणखी एका भाईचा समावेश आहे. योग्यवेळी त्यांचे नाव जाहीर केले जाईल. मावळमधून सर्वाधिक मताधिक्य घेऊन आमचा उमेदवार विजयी होणार आहे.  
जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस