राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येत असून, येत्या २० नोव्हेंबरला दिल्ली येथे १० लाख शेतकऱ्यांची ताकद दाखवून देणार आहे. तेथे समांतर संसद भरवून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यात मांडून त्यातील ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

दिल्लीतील २० नोव्हेंबरच्या राष्ट्रव्यापी शेतकरी परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणार का? या प्रश्नावर सावध भूमिका घेत ही शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांची परिषद असल्याचे सांगून शेट्टी यांनी अधिक बोलणे टाळले. जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत एफआरपीपेक्षा जादाच्या ऊसदराची मागणी राहणार असून, साखर कारखान्यांची काटामारी थांबली पाहिजे. हा या परिषदेतील मुख्य मुद्दा असेल. इलेक्ट्रिक काटे ऑनलाइन करून ते स्वॉफ्टवेअरला जोडून वजनातील चोरी थांबवावी, अशी मागणी या परिषदेत ठराव करून आम्ही शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिकांवरील कीटकनाशकांमुळे ३२ जण मृत्यू पावल्याच्या घटनेला राज्याच्या कृषी विभागाची खालपासून वपर्यंतची संपूर्ण साखळी जबाबदार असल्याचा आरोप करताना, बंदी घातलेले आणि परवाना नसलेले कीटकनाशक विकलेच कसे जाते? असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा चालवलेला पोरखेळ निषेधार्य आहे. कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्याची घाई कशासाठी? प्रमाणपत्रावर किती कर्जमाफी झाली याचा उल्लेख आहे का? याचे फार्म भरण्याची वेबसाइट ओपन होत होती का? अटी आणि शर्ती पाहिल्या तर सरकारला खरोखरच कर्जमाफी द्यायची आहे का? असे प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केले. योजना सरकारला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती द्यायचीच नसून कर्जमुक्तीच्या अन्यायी अटी व निकष, तांत्रिक अडचणी पाहता सध्या शेतकऱ्याच्या भावनेची चेष्टाच चालू आहे. पण, कर्जमाफी देता म्हणजे शेतकऱ्यावर उपकार करीत नसल्याचे शेट्टी यांनी राज्य सरकारला निक्षून सांगितले. शासनाच्या अन्यायी धोरणामुळे शेतमालाचे दर पडले आहेत. शेतकरी अडचणी व संघर्षांतून वाटचाल करीत आहे. तरी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि पुन्हा कर्जबाजारीपणा नको म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जावा ही आमची मागणी आहे. खरेतर, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेती व शेतकरी अडचणीत असल्याने आम्ही येत्या २० नोव्हेंबरला दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट येथे १० लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य परिषद घेऊन ताकद दाखवून देणार आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व १८० शेतकरी संघटना एकत्र येऊन या परिषदेत एकजुटीच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर कदापि गप्प बसणार नसून, देशातील शेतकरी एक करून न्याय हक्कासाठी खडा संघर्ष करून आमचे अधिकार, आम्हाला न्याय मिळवूच असा इशारा शेट्टी यांनी या वेळी दिला. पत्रकार परिषदेला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.