लगतच्या यवतमाळ व वर्धा या विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ातील लोण चंद्रपूर जिल्ह्य़ातही पसरले असून नापिकीसह कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. अस्मानी व सुलतानी संकटात होरपळून चंद्रपूर जिल्ह्य़ात २००३ ते २०१५ पर्यंत ४७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर अवघ्या चार महिन्यात ३७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. कर्जासोबतच औद्योगिक प्रदूषण हे या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. कारण, त्यामुळे जमीन प्रदूषित व रसायनयुक्त झाली आहे. त्यात काहीच पिकत नाही. वीज केंद्राच्या सभोवतालची शेती तर फ्लाय अ‍ॅशमुळे नष्ट झाली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग अवलंबिल्याने संपूर्ण विदर्भ जगाच्या नकाशावर ओळखला जातो. विदर्भातील इतर जिल्ह्य़ांपेक्षा चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना उद्योगाच्या वारेमाप प्रदूषणामुळे नापिकीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे यवतमाळ, वर्धा या सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्य़ातही नापिकीसह कर्जबाजारी शेतकरी मुत्यूला कवटाळत आहेत. शेतकरी आत्महत्यांची शासकीय आकडेवारी बघितल्यास २००३ पासून २०१५ पर्यंत तब्बल ४७४ शेतकऱ्यांनी कर्जबाजारी व नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. यातील ३०८ आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीस पात्र ठरविण्यात आले आहे, तर काहींना मदत मिळायची आहे. यातील ४१ आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची मोठी फरपट होत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबून मुत्यूला कवटाळणाऱ्या शेतकरी कुटुंबाचा सातबारा कोरा करण्याचा पुढाकार कोणी घेत नाही. आजही आत्महत्याग्रस्त कुटुंबांवर कर्जाचा डोंगर ‘जैसे थे’ असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
दरम्यान, कर्जासोबतच औद्योगिक प्रदूषण हे या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. महाऔष्णिक वीज केंद्र, खासगी वीज प्रकल्प, बिल्ट, सिमेंट उद्योग, वेकोलिच्या कोळसा खाणी व पोलाद कारखान्यांमुळे येथील जमीन प्रदूषित व रसायनयुक्त झाली आहे. त्यामुळे शेतीत काहीच पिकत नाही. वीज केंद्राच्या सभोवतालची शेती तर फ्लाय अ‍ॅशमुळे नष्ट झाली आहे. या कारणांमुळे सुध्दा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. २००३ ते २०१५ पर्यंत ४७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मदतीसाठी पात्र ठरले आहे, तर, ४७ आत्महत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. यानंतर २०१० ते २०११ मध्ये ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. २०११ ते २०१२ मध्ये ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यातील ३६ पात्र ठरले असून १० अपात्र आहे. २०१२ ते २०१३ मध्ये १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून पात्र १७, तर दोन अपात्र ठरले आहेत. २०१३ ते १४ मध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, पात्र १२, तर अपात्र १०. २०१४ ते १५ मध्ये २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून २१ पात्र, तर २ अपात्र आहे. २०१५ मध्ये जानेवारीत ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३ पात्र, तर १ अपात्र आहे. फेब्रुवारीत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून ६ जण पात्र आहेत. मार्चमध्ये २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून १४ पात्र, तर ७ अपात्र आहेत. एप्रिलमध्ये ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील ४ शेतकरी कुटुंब मदतीसाठी पात्र, तर २ अपात्र ठरले आहेत.