यवतमाळातील घटना, सर्व एकाच कुटुंबातील, दोघे अत्यवस्थ

शेतीच्या ताब्याच्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या एकाच शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाने खळबळ उडवून दिली आहे.

अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकणे सुरू होते. त्यावेळी एकाच कुटुंबातील कुंदन गौतम, आशीष गौतम आणि उमेश गौतम हे तीन शेतकरी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. तिघेही डोलारी (दारव्हा) येथील राहणारे आहेत. त्यांचा काही लोकांशी शेतीच्या ताब्यासंबंधी वाद आहे. त्या संदर्भात दारव्हा पोलीस आपला छळ करीत असल्याचे सांगत असतानाच अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच त्या तिघांनीही सोबत आणलेली विषाची बाटली पोटात रिचवली आणि ते खाली कोसळले. क्षणार्धात सारे चित्र बदलले. पोलिसांचा ताफा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. त्या सर्वाना तातडीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि वैद्यकीय महाविद्यालयात बघ्यांची तोबा गर्दी झाली. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महसूल खात्याचे अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी दवाखान्यात पोहोचले. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांची नेमकी तक्रार काय आहे, ही बाब पूर्णत: समजण्यापूर्वीच त्यांनी विष प्राशन केले. त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी महसूल अधिकारी दवाखान्यात पोहोचले. मात्र, ते जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्याने आणि प्रकृती गंभीर असल्याने जबाब नोंदवण्यात आले नाही. अधिक तपास यवतमाळचे ठाणेदार करीत आहेत.