यंदाच्या पावसाळी हंगामाला सुरुवात झाल्यासारखे गेल्या काही दिवसांतील बदलते हवामान, ऋतुमानाला शेतकरी, बागायतदार वैतागले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय या बदलत्या हवामानाचा परिणाम रुग्णालये हाऊसफुल्ल गर्दीने भरली जात असल्याने लोक चिंताग्रस्त बनले आहे.
गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाचा शिडकाव होत आहे. आठवडय़ापूर्वी जिल्हाभर पाऊस कोसळला. गेल्या एक-दोन दिवसांत जिल्ह्य़ात विविध ठिकाणी या पावसाने शिडकाव केला. दोडामार्ग आणि वैभववाडी तसेच कणकवली तालुक्यातील अनेक भागांना अवेळी पावसाचा तडाखा बसला.
सकाळीच दाट धुके, खार किंवा पावसाळी वातावरण आकाशात दिसते. पण काही तासानंतर उष्णतेच्या तीव्र झळाही लोकांना सहन कराव्या लागतात. उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकही हैराण बनले आहेत.

आंबा, काजू, कोकम, जांभूळ, वायंगणी भातशेती आणि विविध कृषी उत्पादनाचा हा हंगाम आहे. त्याशिवाय मातीच्या विटा बनविणाऱ्या घटकांनाही या हंगामात अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. त्या सर्वानाच अवेळी पावसाचा झटका बसत आहे.
जिल्ह्य़ात गेल्या काही महिन्यांत अवकाळी पावसाने सर्वानाच धक्का बसला आहे. एकटय़ा आंब्याचे नुकसान झाले नाही तर काजू, कोकम, जांभूळ, विटा उत्पादक, मीठ उत्पादक, सुरंगी कळे-फुले उत्पादक अशा सर्वच घटकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या बदलत्या ऋतुमानामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे दवाखान्यात रुग्णांची, लहान मुलांची गर्दी वाढत आहे. आजही सकाळी ढग दाटून आले होते. पण दुपारपासून उष्णतेच्या तीव्र झळा बसत आहेत. संध्याकाळीदेखील वातावरणात बदल जाणवत होता. अवकाळी पावसाचा धसका सर्व संबंधितांनी घेऊन शेती, बागायती, विटा उत्पादकांनी कामे सुरू ठेवली आहेत.