शिक्षण व्यवस्थेत एका धर्माचे वर्चस्व निर्माण झाले तर इतर धर्मियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि अशी असुरक्षितता देशाच्या सुरक्षिततेला घातक ठरू शकते, अशी टीका केंद्रीय योजना आयोगाचे सदस्य आणि विद्यमान राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केंद्र शासनाच्या शिक्षणातील भगवीकरणासंबंधी नागपुरात केली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशाची शिक्षण व्यवस्था कोणत्याही धर्मावर आधारित नसावी. शिक्षण व्यवस्थेत एका धर्माचे वर्चस्व निर्माण झाले तर इतर धर्मियांमध्ये असुरक्षितेची निर्माण होऊन ते देशासाठी घातक ठरेल. राज्यघटनेची मूलतत्त्वे शिक्षणात असणे आवश्यक आहे. योजना आयोग आणि नीती आयोग (नॅशनल इन्स्टिटय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मिग इंडिया) यामधील फरक स्पष्ट करताना त्यांनी नीती आयोग म्हणजे बुजगावणे असल्याची टीका केली. नीती आयोग श्रीमंत, उद्योगपती, व्यापाऱ्यांच्या कल्याणासाठी असून हे आयोग देशासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. चुकीच्या पद्धतीने योजना आयोग रद्द करण्यात आल्याचे मुणगेकर म्हणाले.