नागपूरमधील दिघोरी उड्डाणपुलाजवळ ट्रेलर आणि दुचाकीच्या धडकेत पितापुत्राचा दुर्दैवी अंत झाला आहे. अल्ताफ अन्सारी (३५) आणि त्यांचा मुलगा साहिल अन्सारी (१२)  असे मृत्यू झालेल्यांचे नाव असून या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नागपूरमध्ये राहणारे अल्ताफ अन्सारी मंगळवारी त्यांचा मुलगा साहिल आणि मुलगी परवीन (१० वर्ष) यांच्यासह दुचाकीवरुन घरी परतत होते. दुपारी दिघोरी उड्डाणपुलाजवळ एका महाकाय ट्रेलरने अन्सारी यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अल्ताफ आणि त्यांच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर परवीन या अपघातात जखमी झाली. अपघातानंतर चालकाने ट्रेलरसह घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सतर्क नागरिकांनी त्याला पकडले. अपघाताचे वृत्त समजताच परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी ट्रेलरची तोडफोड करण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजीही केली. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी ट्रेलर चालकाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. दिघोरी उड्डाणपुलाजवळील रस्त्याची अवस्था बिकट असून परिसरात गोदाम असल्याने कंटेनर आणि ट्रेलरची वर्दळ असते. यासंदर्भात तक्रार करुनही स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अन्सारी यांची दोन्ही मुल आदर्शनगरमधील एका शाळेत शिकतात. शाळा सुटल्यावर अन्सारी मुलांना घेऊन घरी परतत होते. अपघातात पितापुत्राचा मृत्यू झाल्याने अन्सारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.