आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला माणगाव सत्र न्याययालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

जगन्नाथ पांडुरंग वाघरे असे या नराधम पित्याचे नाव असून तो तळा तालुक्यातील भानंग गावचा रहिवासी आहे  तळा तालुक्यातील भानंग गावात राहणारा आरोपी जगन्नाथ वाघरे हा आपली पत्नी व मुलीसह घरात राहत असता ऑगस्ट २०१५ मध्ये रात्री  दरम्यान आपल्याच अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने लंगिक अत्याचार करून तिला कुणालाही सांगू नको. अशी धमकी दिली. सदर मुलीने दुसऱ्या दिवशी घडलेली हकीकत आपल्या आईला सांगितली असता, आईने मुलीला सांगितले की तू शाळेत जा मी वडिलांना बोलते. परंतु नराधम बापाला सवय लागल्याने तो आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर  अत्याचार करीत राहिला. आरोपीच्या पत्नीने आपल्या पतीजवळ सदरच्या घटनेचा जाब विचारल्यावर आपल्या पत्नीला व मुलीला मारहाण केली.

वारंवार लंगिक संबंध आल्याने या अल्पवयीन पिडित मुलीला गर्भधारणा झाली असता तिच्या वडिलांनी मुलीचा गर्भपात करण्यासाठी मुंबई येथे कामा हॉस्पिटल येथे दाखल केले. व नराधम पिता पळून गेला. सदर मुलीची महिला डॉक्टरांनी तपास केली असता ती गरोदर असल्याचे समजले. सदर पिडीत मुलीने आझाद नगर पोलीस स्टेशन मुंबई येथे फिर्याद दाखल केली. त्यानंतर तळा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी.एन.चौधरी यांनी तपास करून पित्याला गजाआड केले होते. या घटनेने तळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. जगन्नाथ वाघरे याला भा.दं.वि. संहिता कलम ३७६(२)(फ)(आय) व पोक्सो कायदा कलम ६ प्रमाणे गुन्हा केल्याचा माणगांव जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालय माणगांव येथे झाली.

सदर गुन्ह्य़ाच्या कामी अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले. या कामी एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांमध्ये पिडीत मुलगी व तिच्या आईने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. त्यांची व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राह्य़ धरून न्यायनिर्णयाच्या आधारे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्ती  सत्र न्यायाधीश माणगांव रा.ना.सरदेसाई यांनी आरोपी जगन्नाथ वाघरे आज आजन्म कारावास व पोक्सो कायदा कलम ६ अन्वये १० वर्ष सक्तमजुरीची व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.