शेतजमिनीच्या वाटणीचा हिस्सा मिळू नये म्हणून वडिलांनीच आपल्या मुलाचा खून केला व मृतदेह शेतातच पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उजेडात आली आहे. या गुन्ह्य़ात मृताच्या सावत्र आईसह सावत्र भाऊ व सावत्र मामा आदी सहा जणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

सुहास अप्पासाहेब पाटील (वय ४२) असे खून झालेल्या पुरूषाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताचे वडील अप्पासाहेब बाबूराव पाटील व सावत्र आई शेषाबाई पाटील यांच्यासह सावत्र भाऊ विवेकानंद, त्याची पत्नी पल्लवी तसेच सावत्र मामा भगवान विट्ठल खडके व विष्णू विट्ठल खडके (रा. धर्मराग) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या ४ ऑगस्ट रोजी आपला मुलगा मृत सुहास पाटील हा अचानकपणे घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार अप्पासाहेब पाटील यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार पोलीस तपास सुरू असतानाच मृत सुहास पाटील यांचे मामा शिवाजी भगवान  पाटील ऊर्फ निचरे (वय रा. ४४, रा. वाघोली, ता. मोहोळ) हे धर्मगाव येथे गेले होते. मेव्हणे अप्पासाहेब पाटील यांच्या शेतात फिरत असतानाा एकेठिकाणी जमीन दाबलेली दिसून आल्याने निचरे यांना संशय आला. त्यांनी ही बाब मंगळवेढा पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिसांनी तहसीलदारांमार्फत जागेचा पंचनामा करीत जमीन खोदली असता त्यात सुहास पाटील याचा मृतदेह आढळून आला, हे कृत्य दुसरे कोणी नाही तर दस्तुरखुद्द सुहासच्या वडिलांनीच दुसऱ्या पत्नी व इतरांच्या साह्य़ाने केल्याचे उजेडात आले. पाटील कुटुंबीयांत वडिलोपार्जित शेतजमिनीची वाटणी करण्यावरून वाद होता, त्यातूनच सावत्र आईसह सावत्र भाऊ व इतरांनी सुहास याचा काटा काढण्यास वडील अप्पासाहेब पाटील यांना फितविले. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.