किरकोळ वादाचे पर्यवसन दोन गटांतील हाणामारीत झाल्याने रविवारी रोहा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने शहरात तणाव निर्माण झाला. या तणावाचे पर्यवसन हाणामारी आणि तोडफोडीत झाले. संतप्त जमावाने शहरातील मोरे आळी परिसरात काही गाडय़ांची मोडतोड केली. घटनेनंतर दोन्ही गटातील व्यक्ती रस्त्यावर उतरल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता.
या घटनेनंतर स्थानिक आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अप्पर पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे
सांगितले.