भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानगडाची शान व मान होते, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. ते आजपर्यंत देत राहिले, आता त्यांची वारस पंकजा हिला मुलगी म्हणून गडाने ओटीत घेतले आहे. तिच्या राजकीय जीवनाची सुरुवात आजपासून होत असल्याने पंकजा ही गडाची मुलगी असल्याचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी सांगितले. उपस्थितांनी हात वर करून त्याला प्रतिसाद दिला. यावेळी पंकजा पालवे म्हणाल्या, ‘मी आता रडणार नाही तर लढणार आणि सर्वसामान्यांचे, बळीचे राज्य आणण्याचे बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांचा संघर्षांचा वारसा चालवणार’.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश बुधवारी आमदार पंकजा पालवे यांनी परळी येथून बीडमाग्रे भगवानगडावर नेला. रस्त्यात जागोजागी दर्शनासाठी मोठय़ा संख्येने लोक जमा झाले होते. दुपारी गडावर सभा मंडपात अस्थिकलश ठेवण्यात आला.  यावेळी बोलताना पंकजा पालवे म्हणाल्या,  ‘वडिलांचे निधन झाल्यानंतर मागील चौदा दिवसांत माझे बाबा कोण होते याचा क्षणोक्षणी अनुभव आला. अंत्यविधीला केवळ मोठे लोकच नव्हे तर गरिबातील गरीब, फाटका दरिद्रीनारायण माणूसदेखील आला होता. बाबा हे सामान्य माणसांचा आत्मा होते. त्यामुळे आता माझा महाराष्ट्र परिवार झाल्याने वडिलांच्या निधनाचे दु:ख गिळून मी आता रडणार नाही तर लढणार आहे.’
शेतीतील अवजार, कोयत्याची धार, वृद्धांचा आधार मुंडे होते, असेही त्या म्हणाल्या. ते गेल्यानंतर घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे राज्यभर लाखो कुटुंबांनी सुतक पाळले. विधी केले. ही लोकांच्या प्रेमाची संपत्ती सांभाळण्याचा वारसा माझ्याकडे देऊन गेले आहेत. ४० वर्षांच्या आयुष्यात मान, अपमान पचवून संघर्ष केला. त्यामुळे जिवात जीव असेपर्यंत त्यांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. आभाळाएवढे दु:ख कोसळले, पण मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी पितृछत्र दिले. आता भगवान गडाची मला पायरी व्हायचे आहे.