कळमनुरी बसस्थानकात कर्मचाऱ्यांच्या भांडणामुळे वाहतूक एक तास खोळंबली. पुण्याकडे जाणाऱ्या बसच्या वाहकास मार्ग तपासणी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी सूर्यवंशी किरकोळ जखमी झाले. वाहतूक निरीक्षक जी. एन. भोसले यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी एकमेकांविरोधात दोघांनी पोलिसात तक्रार केली.
कळमनुरी आगारातील पुण्याला जाणारी बस क्र. (एमएच२०- बीएल२९०२) ही ११च्या सुमारास अग्रसेन चौकात येताच मार्ग तपासणी पथकाचे सहायक वाहतूक निरीक्षक आर. बी. कुलकर्णी, वाहतूक नियंत्रक के. एम. गिरी, ए. एन. जाधव यांनी बस थांबवून बसमध्ये प्रवेश केला. बसस्थानकात गाडी येताच मार्ग तपासणी पथकाने बसचे वाहक एस. एन. िशदे यांच्याकडील तिकिटाचा ट्रे व पशाची बॅग घेण्याच्या कारणातून सुरुवातीला वाद झाला, नंतर हाणामारी सुरू झाली. या दरम्यान बसमधील उतरणारे प्रवासी तिकिटातील उर्वरित रक्कम परत घेण्यासाठी वाहकाकडे मागणी करीत होते. यामुळे अधिक गोंधळ उडाल्याचे प्रवासी मोहमद शौकत यांनी सांगितले. बसस्थानकात असलेला पोलीस कर्मचारी देवीदास सूर्यवंशी हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या डोक्यात मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला.