राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वेध घेणाऱ्या ‘लोकराजा राजर्षी शाहू’ या गाजलेल्या मालिकेनंतर आता शाहूराजांचा जीवनपट उलगडून दाखविणारा चित्रपट लोकांसमोर येत आहे. या चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. याशिवाय  शाहूराजांचे कार्य देशभर परिचित व्हावे यासाठी दूरचित्रवाणीवरील मालिका हिंदीमध्ये सादर करण्याचे कामही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक सुधारणांचे प्रणेते, कलेचा भोक्ता, शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे अग्रणी, लाल मातीतील पलवानांना उत्तेजन देणारा दिलदार राजा अशा अनेक अंगांनी शाहू महाराजांची ओळख सर्वदूर पोहोचली आहे. त्यांच्या या कार्याचा वेध घेणाऱ्या मालिकेची निर्मिती करण्याचा संकल्प करवीरकरांनी मनावर घेतला. त्यातूनच १९९५ साली ‘लोकराजा राजर्ष िशाहू’ या मालिकेची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक अडचणींवर मात करीत ही मालिका या वर्षी ‘सह्य़ाद्री’ या दूरचित्रवाणीवर सादर झाली. मालिकेचे ५८ भाग दाखवले गेले. शाहू महाराजांच्या जीवनातील उर्वरित कार्य राज्यभरातील दर्शकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी आíथक समस्या उभी राहिल्याने मालिकेने अर्धविराम घेतला.
मालिका अपूर्ण राहिल्याची खंत शाहूप्रेमींना जाणवत होती. त्यातूनच विविध पातळ्यावर निधी संकलनाचे काम सुरू झाले. शासनाने १ कोटी ३५ लाखांचे अर्थसाहाय्य केले तर लोकराजाची कलानिर्मितीला सढळ हाताने मदत झाल्याने लोकवर्गणीतून दीड कोटी रुपयांची पुंजी जमली. मालिका निर्मितीचे काम गतीने सुरू झाले. प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ही मालिका एका वाहिनीवर पुनश्च सुरू झाली. ज्या कोल्हापूरला कलापूर म्हणून शाहूंनी ओळख करून दिली. त्यांचेच कार्य कलेद्वारा राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचा आनंद करवीरकरांना इतका झाला, की पहिल्या मालिकेचे प्रसारण समुदायाने ऐतिहासिक भवानी मंडपात पाहण्याचा आस्वाद घेतला. राहुल सोलापूरकर (शाहू) मृणाल कुलकर्णी (राणीसाहेब), उदय टिकेकर (बापूसाहेब महाराज) यांच्यासह शरद भुताडीया, भालचंद्र कुलकर्णी, दिनकर इनामदार आदी कलाकारांनी भूमिकांना न्याय दिला. मालिकेचे दिग्दर्शन सतीश रणदिवे यांनी केले.
मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्षेपण संपल्यानंतर आता शाहूप्रेमींनी महाराजांचे कार्य चित्रपटाद्वारे नव्या पिढीसमोर पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. छोटय़ा पडद्यावर शाहूराजांचे कार्य तपशीलवारपणे दाखविण्यात आले. आता त्यातील निवडक भागांचे संकलन करून तीन तासांचा चित्रपट बनवून तो राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखविण्याचे नियोजन आहे.
चित्रपटाच्या संकलनाचे काम इतिहासकार जयसिंगराव पवार व सहकाऱ्यांनी अखेरच्या टप्प्यात आणले आहे. येत्या काही महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. या जोडीलाच शाहूराजांचे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य देशभरातील जनतेला समजावे यासाठी ही मालिका िहदी भाषेत सादर करण्यात येणार आहे. मालिकेचे डिबग िहदी भाषेत केले जाणार असून त्याची जबाबदारी राहुल सोलापूरकर यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे पाटील यांनी नमूद केले.