विधानसभा निवडणुकीवेळी जनता ठरवेल, त्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकाराशी बोलताना सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील जागा वाटपाबाबत सोनिया गांधी व शरद पवारच अंतिम निर्णय घेणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.
आघाडीतील जागा वाटपाबाबत कोणी काहीही म्हणत असले, तरी याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बठकीतच घेतला जाणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बठक होणार असून त्या वेळी आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल.
सांगलीत काँग्रेसचे निरीक्षक आले असताना इच्छुकांची प्रतीक्षा करावी लागली, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची गर्दी झाली होती याकडे लक्ष वेधले असता डॉ. कदम म्हणाले, की काँग्रेस पक्ष विशाल असून अशा घटकांचा फारसा परिणाम होणार नाही. या वेळी काँग्रेसचा उमेदवार लोकांवर लादला जाणार नाही, तर जनता सांगेल त्या नेत्याला उमेदवारी देण्याचे धोरण स्वीकारले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेल्या घटनेनंतर राज्यात सर्वच डोंगरपायथ्याला असणाऱ्या लोकवस्तीची पाहणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मदत व पुनवर्सन खात्याने बचाव कार्य हाती घेतले असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील. राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनवर्सनासाठी शासनाने ५० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करुन दिला आहे. पुनवर्सन गतीने व्हावे यासाठी लवकरच उच्चस्तरीय बठक बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.