कुपवाड्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले आंबोलीचे सुपुत्र पांडुरंग गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी आंबोलीत आणण्यात आले. आंबोली बाजारपेठ ते मुळवदवाडी येथील गावडे यांच्या घरापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आल्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासह विविध नेते आणि शासकीय अधिकारी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी साश्रूपूर्ण नयनांनी गावडे यांना अखेरचा निरोप दिला.
कुपवाडय़ातील एका अड्डय़ावर लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना यमसदनी धाडण्याचे शूर कृत्य करताना जबर जखमी झालेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान पांडुरंग गावडे (३२) यांना रविवारी वीरमरण प्राप्त झाले होते. गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली-मुळवंदवाडीतील रहिवासी होते. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघ्या पाच महिन्यांचा आहे.
श्रीनगर कूपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेले गावडे ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीम’मध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून कुपवाडा येथे भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान पांडुरंग गावडे यांच्यानजीकच झालेल्या हातबॉम्बच्या स्फोटात त्यांच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. जबर जखमी अवस्थेतच त्यांना प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रविवारी पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली.