सुशीलकुमार िशदे यांचा यशस्वी पुढाकार ; यंदा परंपरेप्रमाणे यात्रेचे नियोजन

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन आराखडा राबविण्यावरून उफाळून आलेल्या वादावर अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार िशदे यांच्या यशस्वी पुढाकाराने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडता टाकला. यंदाच्या वर्षी विशिष्ट परिस्थितीत खास बाब म्हणून सिद्धेश्वर यात्रेसाठी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा लागू न करता पूर्वापार परंपरेने मंदिर समितीच्या मर्जीप्रमाणे यात्रेचे नियोजन केले जाईल. मात्र ही सवलत पुढील वर्षीच्या यात्रेसाठी राहणार नाही, असा दंडक घालण्यात आला आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन आराखडा यंदाच्या वर्षी यात्रेत राबविला जाणार नसल्यामुळे यात्रा निर्वघ्निपणे पार पडण्यास मदत होईल, मात्र त्यामुळे सोलापूरकरांच्या नशिबी धुळीचे प्रदूषण कायम राहणार आहे. यात्रेसाठी आपत्कालीन पर्यायी रस्ताही मनोरंजनाच्या दालनांसाठी खोदला जाणार असल्यामुळे या रस्त्यासाठी झालेला सुमारे ५७ लाखांचाही खर्च पाण्यात जाणार आहे. यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बठकीत या पुढील यात्रेसाठी कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे करायची, यासाठी नेमक्या कोणत्या सूचना दिल्या गेल्या, यावरून मंदिर समिती व प्रशासन यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. सिद्धेश्वर मंदिरात गुरुवारी दुपारी भक्तांनी गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचा सत्कार करण्यात आला.

नऊशे वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर यात्रेत सुमारे पाच लाख भाविक येतात. येत्या १२ जानेवारीपासून यात्रा भरणार आहे. गेल्या वर्षी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम यात्रेसाठी कायदेशीर बंधने घातली होती. त्यावेळी अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सिद्धेश्वर मंदिर समितीला सवलत दिली होती. त्यावेळी मंदिर समितीनेही अल्प कालावधी असल्याची सबब पुढे करून पुढच्या वर्षी म्हणजे यंदाच्या वर्षीच्या यात्रेत कायद्यानुसार सर्वतोपरी दक्षता घेण्याची हमी दिली होती. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी यात्रा भरण्यास दोन महिन्यांचा अवकाश असतानाच जिल्हाधिकारी मुंढे यांनी यात्रेसाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन आराखडा लागू होण्यासाठी पाऊल उचलले होते. परंतु, मंदिर समितीने यात्रेच्या ठिकाणी होम मदानावर धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी चटई अंथरण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी रस्ता मोकळा सोडण्याचे बंधन धुडकावून लावले होते. यावरून प्रशासन व मंदिर समिती यांच्यात वाद उफाळून आला होता. पालकमंत्री विजय देशमुख यांनी सिद्धेश्वर भक्तांचे आंदोलन हाती घेतले होते.

पालकमंत्री देशमुख यांचे जिल्हाधिकारी मुंढे यांच्याशी कधीही पटलेले नाही. सिद्धेश्वर भक्तांच्या आंदोलनाला देशमुख-मुंढे वादाचीही पाश्र्वभूमी होती. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पालकमंत्रीच आंदोलन करीत असल्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत चालली होती. अखेरीस पालकमंत्री देशमुख यांना आंदोलनातून अंग काढून घेणे भाग पडले होते.

पालकमंत्र्यांची मर्यादा

मंदिर समिती व प्रशासन यांच्यातील वाद सोडविण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम यांनी प्रयत्न केले. त्यानंतर गेल्या २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूरच्या भेटीवर आले असता त्यांनी या वादाच्या सोडवणुकीबाबत घेतलेली भूमिका संदिग्ध स्वरूपाची होती. या पाश्र्वभूमीवर सिद्धेश्वर भक्तांचे आंदोलन पुन्हा पेटले असता त्यात पालकमंत्री देशमुख यांच्या मर्यादा पाहून अखेर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वजन वापरले आणि त्यातून यंदाच्या वर्षांसाठी का होईना, यात्रेच्या वादावर पडदा पडला आहे.

वादावर पडदा टाकताना मुख्यमंत्री फडणवीस जिल्हाधिकारी मुंढे यांची पाठराखण करण्यास विसरले नाहीत. जिल्हाधिकारी मुंढे हे कायद्याची अंमलबजावणी करतात, असा निर्वाळा देत फडणवीस यांनी  मुंढे यांची बदली करणार नसल्याचेही संकेत दिले आहेत.