मुरुडचे शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मिसाळ व अन्य सहा जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन परस्पर विकल्याप्रकरणी नंदकुमार मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहे.
नंदकुमार बाळकृष्ण मयेकर यांच्या आजोबांच्या नावावर कोर्लई येथे जागा होती. सव्‍‌र्हे नंबर ५९-५ मधील राजाराम नारायण जाधव यांच्या या जागेत भराव सुरू असल्याचे मयेकर यांच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता सदर जागा ही आजोबांकडून विकत घेतल्याचे सांगण्यात आले. मयेकर यांनी मुरुड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात याबाबत चौकशी केली असता प्रशांत मिसाळ यांनी आपल्या मयत आजोबांच्या जागी गोिवद रामजी ओळंबे यांना उभे करून सदर जागेची सुहासिनी बिरवाडकर यांना विक्री केल्याचे निदर्शनास आले. यानंतर बिरवाडकर यांनी ही अलिबाग मोहल्ला येथील कादरी कुटुंबाला विकल्याचेही समोर आले. या संपूर्ण प्रकरणात कोर्लईचे तत्कालीन सरपंच आणि मुरुडचे विद्यमान शिवसेना तालुकाप्रमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा दावा मयेकर यांनी केला आहे.
मयेकर यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी भादंवी, कलम ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४७३ आणि ३४ अन्वये रेवदंडा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गोिवद रामजी ओळंबे, प्रशांत जानू मिसाळ, सुहासिनी बिरवाडकर, प्रकाश पुरुषोत्तम िशदे, नरेंद्र पुरुषोत्तम िशदे, मनोज जानू मिसाळ आणि सुनिल बाळकृष्ण बिरवाडकर यांचा समावेश आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्य़ात जमिनीला चांगला भाव आहे. यातूनच बनावट कागदपत्र तयार करून, बोगस व्यक्तींना उभे करून जमीन खरेदी-विक्रीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात शिवसेना तालुकाप्रमुख मिसाळ यांचेही नाव समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.