राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. मात्र आता न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जानकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपला पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कपबशी हेच निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न केला, असे मोबाईलवरील संभाषणातून दिसून आले होते. याशिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनादेखील जानकर यांनी दिल्या होत्या. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून महादेव जानकरांना नोटीस बजावण्यात आली होती. २४ तासांमध्ये उत्तर देण्याची सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. यानंतर आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नसल्याचे स्पष्टीकरण महादेव जानकर यांनी एका जाहीर पत्राद्वारे दिले होते. मात्र आता निवडणूक आयोगाने महादेव जानकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महादेव जानकर आणि देसाईगंजमधील जेसा मोटवानी यांच्याविरोधात रात्री देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले होते. ‘नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे दोन अर्ज येतील. त्यातील एक अर्ज काँग्रेसचा असेल. तर दुसरा अपक्ष म्हणून असेल. त्यातील काँग्रेसचा अर्ज बाद करा. ‘मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील. त्यांना कपबशीचे चिन्ह द्या,’ अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. याशिवाय ‘मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे’, असेदेखील जानकर या व्हिडीओमध्ये समोरच्याला सांगताना दिसत होते.

गडचिरोलीत वडसा नगरपालिकेसाठी पुढील टप्प्यात निवडणूक होणार आहे. या नगरपालिकेत काँग्रेसचे जेसालाल मोटवानी दोन वेळा नगराध्यक्ष राहिले आहेत. मात्र यंदा नगराध्यक्ष महिलेसाठी राखीव झाल्याने मोटवानी यांनी त्यांच्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने मोटवानी यांच्या सुनेला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मोटवानी यांनी सुनेला निवडून आणण्यासाठी एक पॅनल तयार केले. या पॅनलला महादेव जानकर यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या पॅनलला कपबशी चिन्ह द्यावे, यासाठी दबाव आणल्याचा आरोप जानकरांवर आहे.