पुलगाव येथील घटना; दोन अधिकाऱ्यांसह १६ जणांचा मृत्यू, १७ जखमी

भारतीय सेनादलांसाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारास मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लेफ्टनंट कर्नल आर. एम. पवार, मेजर मनोज के. या दोन अधिकाऱ्यांसह १ जवान व १३ अग्निशामक जवान मृत्युमुखी पडले असून १७ जखमी आहेत. रात्रीच्या धडक कारवाईत आग आटोक्यात आली आहे.

हे दारुगोळा भांडार देशातील सर्वात मोठे तर आशियातील क्रमांक दोनचे भांडार आहे. चारशे एकरवर पसरलेल्या या भांडारातील या आगीचे नेमके कारण आणि त्याच्या प्रभावक्षेत्राविषयी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी लगतच्या गावांतील अनेक घरांचीही या आगीनंतरच्या स्फोटांनी पडझड झाली असून काही नागरिक जखमीही झाले आहेत.

आगीच्या आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाळा व स्फ ोटांच्या भयावह तीव्रतेमुळे परिसरातील तीन गावातील शेकडो नागरिकांनी पहाटेच गाव सोडले. त्यांना शिबिरात ठेवण्यात आले असून स्फ ोटाच्या तीव्रतेने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. आग विझल्यानंतर परिसरातील काळ्याठिक्कर पडलेल्या टेकडय़ांचे चित्र आगीची तीव्रता स्पष्ट करीत होते.

पर्रिकर यांच्यासह लष्करप्रमुख दलबिरसिंग सुहाग यांनीही घटनास्थळी भेट दिली.  १७ जखमींवर सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

तर्कवितर्क

भांडाराच्या कुंपणालगतच्या स्फ ोटकांच्या साठय़ाला प्रथम आग लागल्याचे सांगण्यात येते. मात्र, ती कशी लागली, याविषयी तर्क-वितर्कच व्यक्त केले जात आहेत. सैनिकी व नागरी प्रशासनात कसलाच समन्वय नसल्याने व सुरक्षेबाबतच्या गोपनीयतेचे कारण पुढे केले जात असल्याने याविषयी खरी माहिती मिळण्यास विलंबच लागणार आहे. भांडार परिसरातील वाळल्या गवतास आग लागल्याने, शार्टसर्किटने, निकामी बॉम्ब फु टल्याने व अधिकाऱ्याने सुरक्षेबाबत दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत.

घातपाताची शक्यता नाही

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या आगीमागे घातपाताची शक्यता नाकारली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, या भांडारातील ९ डेपोंपैकी एकाने प्रथम पेट घेतला. त्याची आग पसरू नये म्हणून जवानांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ८ डेपो बचावले आहेत.

तिसरा स्फोट..

याआधी १९८९ आणि १९९५ सालीही या भांडारास अशीच आग लागली होती. मात्र त्या आगीत कोटय़वधींचा साठा भस्मसात झाला असला तरी जीवितहानी झाली नव्हती. यावेळी मात्र सेनादलांच्या दारूगोळ्याचाही मोठय़ा प्रमाणात विध्वंस झाला असून जीवितहानीही मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीविषयी शोक व्यक्त केला.

मृतांच्या आप्तांना पाच लाखांची मदत

राज्य सरकारने मृतांच्या आप्तांना पाच लाखांची  तर जखमींना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. मृतांची संख्या ७० च्या घरात असल्याची दाट शक्यता माजी सैनिक अधिकारी संघटनेने व्यक्त केली असून काही मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याविषयी अधिकृत भाष्य ते उद्या,बुधवारी करणार आहेत.

जखमींमध्ये प्रदीपकुमार मनशिरण, राजेंद्र महाजन, तेत्रपाल रणसिंग, संतोष पाटील, श्यामकुमार, सतीश गोगावकर, दीपक शिंदे, राम वनकर, ललित कुमार, बच्चनसिंग, गजेंद्र सिंग, एम. त्रिपाठी, जगदीश चंद्र, स्वप्निल खुरगे, लोकेश शरद यादव व के. एम. साहू यांचा समावेश आहे. यापैकी काहींच्या हातापायास व अन्य स्वरूपात जखमा आहेत.

सैरभैर जनजीवन

दारूगोळा भांडारालगतच्या काही गावातील गावकऱ्यांनी मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीचे रौद्ररूप अनुभवतांनाच संकटातून सुटल्याचा सुस्कारा सोडला. भांडारालगतच्या अनेक गावांतील शेती पूर्वीच सैन्यदलाने अधिग्रहित केली. उर्वरित परिसरातील शेतीवर नागझरी, सोनेगाव, आगरगाव, मुरदगाव वसले आहे. ही सर्व गावे आगीच्या लोटात झाकोळून गेली होती. पहाटे साखरझोपेत असतांनाच भूकंप झाल्यागत कानठळ्या बसविणारा आवाज झाला. लोक तातडीने घराबाहेर पडले. आगीचे लोट, आकाशात दूरवर उडालेली माती, घरांची पडझड, भांडय़ाकुंडय़ांचा आवाज सर्वाना सैरभर करणारा ठरला. अनेकांनी शेताकडे धूम ठोकली. काही देवळीकडे पळाले. नांदोऱ्याच्या मार्गे धावू लागले.