वर्ध्यामधील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला सोमवारी रात्री उशीरा अचानक लागलेल्या आगीत २ लष्करी अधिकाऱयांसह २० जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीनंतर भीषण स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. स्फोट इतका भयंकर होता काही किलोमीटरवरूनही आगीचे लोट स्पष्ट दिसत होते. स्फोटात २० जवान जागीच ठार झालेत, तर लेफ्ट. कर्नल आरएस पवार आणि मेजर के.मनोज या दोन लष्करी अधिकाऱयांचा मृत्यू झाला. याशिवाय, १९ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काही जण गंभीर असल्याचे समजते. थोड्याच वेळात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या दुर्घटनेचे दु:ख व्यक्त केले आहे.

सोमवारी रात्री दारुगोळा भांडारातून धूर येत असल्याचे लष्करी अधिकाऱयांना दिसले. त्या पाहणीसाठी दोन अधिकारी काही जवानांसह गेले असता भांडाराचा दरवाजा उघडताच दोन बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण स्फोटामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. स्फोटात लेफ्ट. कर्नल आणि कर्नल पदावरील दोन लष्करी अधिकारी आणि २० जवान जागीच ठार झाले. भीषण स्फोट झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुलगावच्या आजूबाजूच्या दोन गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पुलगाव येथील दारुगोळा भांडाराचा हा परिसर बराच मोठा आहे. जवळपास २८ किमीपर्यंत हा दारुगोळा भांडाराचा परिसर पसरला असून अजूनही स्फोटांचे आवाज सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जवळपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्फोट झाल्याने परिसरातील गावांना जबर हादरे बसले. आग ऐवढी भीषण होती की कॅम्प परिसरालगतच्या १५ किमी. परिघातील गावांतील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत होत्या. परिसरात कडेकोट सुरूक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जखमींची नावे-

प्रदीपकुमार मनशिरन, राजेंद्र महाजन, नेत्रापल रनसिंग, संतोष पाटील, शयाज कुमार, सतिष गोवावकर, दीपक शिंदे, राम नामदेवराव वानकर, ललित कुमार, बच्चन सिंग, गजेंद्र सिंग, एस.त्रिपाठी, जगदीश चंद्रा, स्वप्नील रमेश खुरगे, लोकेश, शरद याधव, के.एम.साहू