तालुक्यातील वैजापूर वन परिक्षेत्रातील राखीव वनखंडाच्या जागेवरील अतिक्रमण रोखण्याची कारवाई करताना शासकीय अधिकाऱ्यांना काही ग्रामस्थांनी धक्काबुक्की केल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी वन अधिकाऱ्यांना हवेत गोळीबार करावा लागला.
वैजापूर वन परिक्षेत्रातील राखीव वनखंड क्रमांक २४२ मध्ये सुमारे एक हेक्टर जागेवर वना नुरजी पावरा हा झाडे तोडून झोपडीची उभारणी करत होता. हे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करूनही वन विभागाला यश आले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी वन विभागाच्या देवझिरी, वैजापूर व चोपडा येथील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करून अतिक्रमण हटविले. त्यानंतर संशयित वना पावराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात घटनास्थळी परिसरातील स्थानिक आदिवासी जमा झाले. त्यांनी पावराला सोडण्याची मागणी केली. या वेळी काही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याने पाहून वन अधिकाऱ्यांनी हवेत फैरी झाडल्या. जमाव पांगल्यानंतर संशयिताला चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या कारवाईत वन क्षेत्रपाल यू. बी. वसईकर, पी. एस. शिंदे यांच्यासह राज्य राखीव दल, वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.