शहरातील देगलूरनाका परिसरातील रहेमतनगर येथे एका घराला लागलेल्या आगीत रंगकाम करणाऱ्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात माता-पित्यासह दोन वर्षांच्या मुलाचा समावेश असून तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. उपचार सुरू असतानाच ती मुलगीही दुपारी मरण पावली. ही दुर्घटना रविवारी पहाटे घडली.
अब्दुल समद शेख हुसेन (वय २६) याची सासरवाडी रहेमतनगर येथे आहे. सासरवाडीलगतच टीन पत्राची रूम भाडय़ाने घेऊन समद हा आपल्या कुटुंबीयांसमवेत राहात होता. बिल्डिंगला रंग मारण्याचे काम समद करीत असे. शनिवारी रात्री अब्दुल समद हा आपल्या कुटुंबीयांसह जेवण करून रात्री झोपला होता. कुटुंबीय झोपेत असतानाच त्यांच्या घराला आग लागली. या आगीने घरातील टीव्ही, कुलर व इतर संसारोपयोगी साहित्याने पेट घेतला. या आगीत अब्दुल समद शेख हुसेन, त्याची पत्नी असमाबेगम अब्दुल समद (वय २३),  दोन वर्षांचा मुलगा शेख बिलाल अब्दुल समद हा भाजून जागीच ठार झाला. तीन वर्षांची मुलगी जोहा अब्दुल समद ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुपारी ३ वाजता तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली.
 समद कुटुंब गाढ झोपेत असतानाच आगीने पलंगावरील गादीने पेट घेतला. टीव्ही व कुलर जळाल्यामुळे विषारी वायूने अब्दुल कुटुंबीयातील सदस्य बेशुद्ध होऊन गंभीररीत्या भाजले गेले. त्यातच त्या चार जणांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अब्दुल समद याच्या घराला लागलेली आग रविवारी पहाटेपर्यंत होती. अब्दुल समद यांचे नातेवाईक पहाटे नमाजसाठी जात असताना घरातून धूर निघत असल्याचे त्यांना दिसले. नातेवाइकांनी अब्दुल समद यांना उठवण्याचा प्रयत्न करून घराच्या दारावर थाप मारली, परंतु आतून त्यांना कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे घरावरील टीन पत्रे काढून नातेवाईक व शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला असता अब्दुल समद व त्याचे कुटुंबीय भाजलेल्या अवस्थेत आढळून आले.
घराला आग लागल्याची वार्ता वाऱ्यासारखी रहेमतनगर येथे पसरताच बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. याच भागातील सय्यद मोईन, मनपातील गटनेते शेरअली, नगरसेवक हबीब बागवान यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन त्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तिघे मृत झाल्याचे घोषित केले. गंभीर जखमी झालेली जोहा हिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. परंतु दुपारी ३ वाजता तिचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नेमकी आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही.