येथील वखारभाग परिसरात असलेल्या भिकूलाल दगडूलाल मर्दा यांच्या कापडाच्या दुमजली गोदामाला शॉर्टसíकटने भीषण आग लागली. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी शहर व परिसरातील सुमारे शंभराहून अधिक अग्निशमन बंब पाण्याचा मारा केला. पहाटेच्या सुमारास लागलेली आग सुमारे दहा तासापर्यंत धुमसत होती.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वखारभाग परिसरात भिकूलाल मर्दा याचे अरिवद हाऊस नामक दुमजली इमारत आहे. या ठिकाणी खालच्या मजल्यावर पाठीमागील बाजूस कापडाचे गोदाम तर समोर व वरच्या मजल्यावर कार्यालय आहे. या ठिकाणी त्यांच्या विविध उद्योगांतील विविध क्वालिटीचे प्रक्रिया केलेले तयार कापड या ठिकाणी पॅकिंग केले जाते. त्यांचा अरिवद नामक ब्रँड असून, या ठिकाणाहून तो देशभरात पाठवलो जातो. शहर व परिसरातील सर्वात जुने व प्रसिद्ध उद्योजक म्हणून मर्दा यांची ओळख आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोदामातून धूर व आगीचे लोळ येत असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच घटनेची माहिती मर्दा यांनाही दिली. गोदामात मोठय़ा प्रमाणात पॅकिंग कापडाचे गठ्ठे असल्याने आग मोठय़ा प्रमाणात फैलावत गेली. आग विझवण्यासाठी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, नगरपालिका, घोडावत उद्योग समूह, जवाहर साखर कारखाना, दत्त कारखाना, पंचगंगा कारखाना, पार्वती औद्योगिक वसाहत आदी ठिकाणचे अग्निशमन दल बंबासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तर कर्मचा-यांसह परिसरातील नागरिकांनी गोदामातील महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. पहिल्या मजल्यावर कापडसाठा असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. तर आगीचे लोळ दुसऱ्या मजल्यावरही पोहोचल्याने वरील कापडाच्या गाठी तसेच कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग धुमसत असल्याने धुराचे लोट उंचच्या उंच दिसत होते. आगीची तीव्रता इतकी भयानक होती की गोदामातील लोखंडी कपाट, छताचे लोखंड चॅनेल वितळून वाकले होते. तर आगीच्या तीव्रतेने छताचे पत्रे फुटून उडून गेले. तर काँक्रीटच्या भिंतींना तडे जाऊन भिंती पडत होत्या. तर आगीच्या झळांनी परिसरातील झाडांची पाने करपली होती. मोठय़ा प्रमाणात एकावर एक असा साठा असल्याने पाण्याचा मारा करूनही आग विझवण्यास अडथळे येत होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने भिंती पाडून गोदामातील साहित्य बाहेर काढण्यात येत होते. सुमारे दहा तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही आग विझवण्यसाठी शंभराहून अधिक बंबांद्वारे जवानांनी पाण्याचा मारा केला. या घटनेत गोदामाचे शटर्स, खिडक्या तसेच अन्य साहित्यासह कापड गाठी असे सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदींनी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.