धुळ्यातील दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करण्याची गरज होती. मात्र, गरजेपेक्षा जास्त गोळीबार करण्यात आला, असा अहवाल पोलिस दलाने राज्य सरकारकडे दिला आहे. सहा जानेवारीला धुळ्यात एका रेस्तरॉंचे बिल देण्यावरून उसळलेली दंगल रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यामध्ये म्हटले आहे की, दंगलीची तीव्रता जास्त असलेल्या भागात वरिष्ठ पोलिस अधिकारी पुरेसा फौजफाटा न घेता गेले. तिथे असलेल्या दंगलखोऱांना रोखण्यासाठीच त्यांना गोळीबार करावा लागला.
धुळ्यातील दंगलप्रकरणी गेल्याच आठवड्यात सहा पोलिस कर्मचाऱयांना अटक करण्यात आली. त्यांना स्थानिक न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेले पोलिस कर्मचारी हे स्वतःच हिंसाचार करीत असल्याचे एका व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते आहे.