महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे अवघ्या देशात वातावरण तापले असतानाच मुलींची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गावठी बंदुकीतून गोळीबार होण्यात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री येथील म्हाळदे शिवारात घडली. घटनेत टवाळखोर मुले बाजूलाच राहिले. मात्र मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच मुलींच्या नातेवाईकांचा रोष सहन करावा लागला. सुदैवाने गोळीबारात तो बचावला. या प्रकरणी आझादनगर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
टवाळखोर मुलांकडून वारंवार होणाऱ्या छेडछाडीमुळे वैतागलेल्या एका मुलीच्या आईने आपला जावई कमर अली सरफअली याच्याकडे हा प्रकार सांगितला होता. कमर व त्याचे अन्य तीन साथीदार संबंधित टवाळखोरांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर गल्लीत उभे राहून मोठमोठय़ाने बोलत होते. त्या वेळी याच भागातील माजिद एकबाल यांनी स्थानिक वाद स्थानिक पातळीवर मिटवून टाका, असे सांगत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे मध्यस्थी करण्याचा प्रकार खटकल्याने संतप्त झालेल्या या चौघांनी माजिद यांना लाकडी दांडय़ाने मारहाण केली. तसेच एकाने गावठी बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने गोळ्या त्यांना लागल्या नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कमर अली व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाले आहेत.