विदर्भ आणि मराठवाडय़ाकडे पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा शेतकरी हवालदिल झालेला असतानाच दुसरीकडे विदर्भात मात्र मत्स्यव्यवसाय भरभराटीला आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मत्स्योत्पादनात तब्बल १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाअभावी दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करीत असताना शेतीपुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाचा विचार करण्यास पुन्हा शेतकऱ्याला भाग पडले आहे.
बिनभरवशाच्या पावसामुळे शेतीवरील संकट आता टाळता येण्यासारखे नाही. अशा वेळी महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास महामंडळाने या शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाची वाट दाखवली आहे. राज्यात ठिकठिकाणी या महामंडळाकडून मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात असताना त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून आले आहे. गेल्या वर्षी १ कोटी १२ लाख एवढे मत्स्य उत्पादन झाले होते. यावर्षी विदर्भ आणि मराठवाडय़ाकडे पावसाने पाठ फिरवलेली असताना चालू वर्षांत मत्स्योत्पादन १ कोटी २१ लाखावर गेले आहे. वर्षअखेरीस ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे वाढलेले उत्पादन प्रामुख्याने विदर्भातील सायखेडा, नलेश्वर, खेकरानाला, पेंच, बोर आणि अप्पर पैनगंगा जलाशयाताल आहे. या सर्व ठिकाणी नवीन पिंजरा पद्धतीने (केज कल्चर) मत्स्य व्यवसाय केला जात आहे. जलाशयात मोठमोठे पिंजरे लावून त्यात मत्स्यबीज टाकायचे. त्यांच्या वाढीसाठी लागणारे अन्न टाकायचे आणि मासे बाहेर काढायचे.
यापैकी बोर आणि पेंच या ठिकाणी प्रत्येकी ४५ पिंजरे आहेत. विदर्भात मत्स्योद्योगाच्या वाढीसाठी १५ कोटी रुपयाचे मार्केट मंजूर झाले आहे. त्यापैकी नागपूर जिल्ह्णाात १०, यवतमाळमध्ये एक आहे. पारशिवनीचे मार्केट पूर्णत्वास आले असून रामटेकचे मार्केट ७५ टक्के, तर उमरेड येथील मत्स्य मार्केट पूर्ण झाले आहे. नागपुरातील  मंगळवारी येथे एक मार्केट पूर्ण झाले असून महालमधील प्रक्रियेत आहे.

बुटीबोरी एमआयडीसीजवळ महामंडळाच्या मालकीची दोन एकर जागा आहे. या जागेवर मास्यांसाठी ‘ड्रेसिंग सेंटर’ प्रस्तावित आहे. जलाशयातील पिंजऱ्यात तयार झालेले मोठे मासे या केंद्रात आणायचे. त्यांचे तुकडे करून आणि त्यावर प्रक्रिया करून ते केंद्रातील फ्रीजमध्ये ठेवायचे. नंतर त्याला ‘ड्रेसअप’ करून ते इतर शहरात पुरवायचे. या केंद्रासाठी ३ कोटी रुपये मागण्यात आले असून ते प्रस्तावित असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.