समुद्रात अनधिकृत पर्ससीन मासेमारी तसेच परप्रांतीयांचा धुडगूस रोखण्यास शासनाला अपयश आल्याने युवा मच्छीमार नेते अन्वय प्रभू मालवण किल्ला येथील सात ते आठ वाव खोल समुद्रात उपोषण सुरू केले आहे. पालकमंत्र्यांनी उद्या मंगळवारी भेट दिली नाही, तर हे आंदोलन उग्रपणे छेडण्याचा इशारा दिला आहे. मच्छीमार संघटनेचे छोटू सावजी, रविकिरण तोरस्कर व पारंपरिक मच्छीमारांचा या आंदोलनास पाठिंबा आहे. सात ते आठ वाव खोल समुद्रात मालवण किल्ला येथे सुरू असणारे आंदोलन प्रथमच होडी समुद्रात ठेवून सुरू करण्यात आले आहे. समुद्रात आंदोलन सुरू असूनही मत्स्योद्योगमंत्री एकनाथ खडसे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमारांनी निषेध केला आहे. मागील आठवडय़ात खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन यंत्रणेला निर्देश दिले होते. पर्ससीनची अनधिकृत मासेमारी रोखावी आणि परप्रांतीय ट्रॉलर्सच्या धुडगुसावर कारवाई करावी. या दोन घटनामुळे पारंपरिक मच्छीमारांचे प्रचंड नुकसान होत आहे याकडे अन्वय प्रभू यांनी लक्ष वेधून उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनी आठ वाव खोल समुद्रात उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उद्या मंगळवापर्यंत भेट देऊन कारवाई करण्याचे पाऊल उचलले नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी शिवसेनेविरोधात राग मनात ठेवला नाही, पण मत्स्योद्योगमंत्री व पालकमंत्री यांच्यावर मात्र राग व्यक्त करून निषेध व्यक्त केला आहे.