पर्ससीन नेटधारकांना ३१ डिसेंबरनंतर मासेमारीला बंदीच्या निर्णयावरून राजकारण तापले असून यापूर्वी पारंपरिक मच्छीमारांबरोबर असलेल्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी कोलांटउडी मारत पर्ससीन नेटधारकांची बाजू उचलून धरली आहे.

राज्य शासनाने गेल्या ५ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या मासेमारी धोरणानुसार पर्ससीन नेट असलेल्या बोटींना ३१ डिसेंबरनंतर बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांना १२ नॉटिकल मैलांच्या आत मासेमारीलाही मनाई करण्यात आली आहे. या विरोधात सेनेचे आमदार साळवी यांच्या नेतृत्वाखाली या बोटींच्या मालकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन ही बंदी, तसेच नवीन मासेमारी परवाने देण्यावर घालण्यात आलेले र्निबधही उठवण्याची मागणी केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला असलेल्या प्रशासकीय मर्यादा या शिष्टमंडळाच्या निदर्शनास आणून देत सुरक्षिततेच्या दृष्टीने एआयएस (ऑटोमॅटिक इन्फर्मेशन सिस्टम) बसवून घेण्याची सूचना केली. त्याचबरोबर या नौकाधारकांच्या मागण्या शासनापर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीनंतर आमदार साळवी यांनी आक्रमक भूमिका घेत पर्ससीन नेटधारकांच्या बाजूने रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पारंपरिक मच्छीमार आणि मोठय़ा यांत्रिक नौका असलेले पर्ससीन नेटधारक यांच्यात गेली काही वष्रे संघर्ष चिघळला आहे.

त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी पर्ससीन नेटधारकांच्या बाजूने, तर शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने भूमिका घेतली होती. शिवसेनेची ही अधिकृत भूमिका असल्याचे त्या वेळी आमदारद्वयांनी जाहीरपणे सांगितले होते. पण या संदर्भात पारंपरिक मच्छीमारांना अनुकूल भूमिका राज्य शासनाच्या धोरणाद्वारे घेण्यात आल्यानंतर आमदार साळवी यांनी अचानक पर्ससीन नेटधारकांच्या बाजूने उडी मारली आहे.

त्यांच्या मतदारसंघातील साखरी नाटे, जैतापूर परिसरातील पर्ससीन नेटधारकांच्या दबावामुळे, तसेच जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनाला या मच्छीमारांमुळे बळ मिळत असल्याने त्यांनी अशा प्रकारे भूमिका बदलली असावी, असा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले मच्छीमार नेते अमजद बोरकर हेही या मुद्दय़ावर साळवी यांच्याबरोबर आहेत.

दरम्यान शिवसेनेचे दुसरे आमदार उदय सामंत या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, मी आजही पूर्णपणे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र पर्ससीन नेटधारकांना ३१ डिसेंबरनंतर मासेमारीला बंदी घालण्याबाबतचे र्निबध शिथिल करण्यात यावेत, असे वाटते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष माने यांच्याशी मात्र या संदर्भात संपर्क होऊ शकला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात एकूण २७५३ मासेमारी नौका असून त्यापैकी सुमारे ५० टक्के नौका बिगरयांत्रिकी आहेत. जिल्ह्य़ातील ट्रॉलर्सची संख्या सुमारे ९०० असून सुमारे पावणेतीनशे पर्ससीन नेटधारक आहेत.