अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वारे वाहत असून मासेमारी बंद पडली आहे. तसेच मच्छीमारांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऐन दिवाळीच्या दिवसांत गेल्या शुक्रवार संध्याकाळपासून कोकणातील हवामान झपाटय़ाने बदलले आहे. विशेषत: शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गेले दोन दिवस सर्वत्र ढगाळ हवामान असून अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत.
हवामान खात्याने या पावसाची पूर्वसूचना गेल्याच आठवडय़ात दिली होती. त्यानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यापाठोपाठ समुद्रात चक्रीवादळही निर्माण झाले असल्यामुळे तटरक्षक दलाने मच्छीमारांना आणखी तीन दिवस सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील बंदरांवर मच्छीमार नौका विसावल्या आहेत.
    कोकणात दिवाळीच्या सुमारास अशा प्रकारे पाऊस किंवा चक्रीवादळाचा धोका नेहमीच असतो. २००९ च्या नोव्हेंबरात झालेल्या फयान वादळाने कोकण किनारपट्टीवर हाहाकार उडवला होता. सध्याही अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘निलोफर’ या चक्रीवादळामध्ये रूपांतर झाले आहे. कोकण किनारपट्टीला या वादळाचा धोका नसला तरी शेतात कापणीसाठी तयार असलेल्या भातपिकाच्या दृष्टीने मात्र सध्या पडत असलेला पाऊस हानिकारक ठरत आहे. अनेक ठिकाणी पीक आडवे झाले असून भाताच्या लोंब्यांमधील दाणे गळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान निवळल्यानंतर कापलेले पीक वाळवून झोडणी करावी लागणार असल्यामुळे शेतीच्या कामाचे दिवस वाढले आहेत.