अक्षय तृतीयेच्या दिवशी येथून ३३ कि.मी. अंतरावरील पातूर तालुक्यातील आस्टुल या खेडेगावी संजय पूर्णाजी इंगळे (वय ५०) या सधन शेतकऱ्याने तसेच पत्नी मनिषा (४५), मुली ऐश्वर्या  (२०), मयुरी (१८) आणि मुलगा रोशन (१८) या पाचजणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
३५ एकरची शेती असलेले इंगळे हे सधन शेतकरी होते तसेच पहाटे तीन वाजता ते शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते, त्यामुळे शेतीच्या अडचणीपायी त्यांनी आत्महत्या केली नसावी, असा तर्क आहे. यातील तिन्ही मुलांच्या आत्महत्येबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कारण संजय आणि त्याच्या पत्नीने एकाच झाडाला फास लावून आत्महत्या केली आहे. मुलगा रोशन याचा मृतदेह मात्र एका खांबाला टेकून बसलेल्या अवस्थेत होता तर दोन्ही मुलींचे मृतदेह भुईमुगाच्या शेतात आढळले. या दोन मुलींचा गळा आवळून खून झाल्याची गावात चर्चा असून पोलिसांनी कोणत्याही गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.
पहाटे पाच वाजता या आत्महत्या झाल्याचा तर्क असून पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

स्नेहा बचावली
संजय इंगळे यांची मोठी मुलगी अकोला येथील रणपिसे नगर मध्ये आपल्या आजोबांकडे रहावयास होती तिला घरी नेण्यासाठी संजय इंगळे आले होते पण आजीची तब्येत ठीक नसल्याने आपण नंतर येऊ, असे तिने सांगितले व ती गेली नाही म्हणूनच ती बचावली असे सांगण्यात येत आहे.