ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चार व ब्रम्हपुरी वन विभागातील एक, अशा पाच जेरबंद बिबटय़ांना मध्यप्रदेशातील भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. तसा प्रस्ताव वन्यजीव विभाग व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या या जिल्ह्य़ात वाघ व बिबटय़ांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे चंद्रपूर, मूल, सावली, ब्रम्हपुरी, चिमूर, गोंडपिंपरी, पोंभूर्णा व बल्लारपूर तालुक्यातील जंगलांजवळच्या काही गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जंगलात वनखात्याने वाघ व बिबटय़ांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत. दुसरीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात चार व ब्रम्हपुरी वन विभागात एक बिबटय़ा जेरबंद आहे. या बिबटय़ांना भोपाळजवळील वनविहार राष्ट्रीय उद्यानात सोडण्याचा गांभीर्याने विचारा सुरू आहे. ब्रम्हपुरी वन विभागातील जेरबंद दोन बिबटय़ांना १९ जुलैला भोपाळच्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले तेव्हा वन अधिकाऱ्यांनी आणखी किती बिबटे तेथे ठेवू शकतात, याची सविस्तर माहिती घेण्यात आली होती. त्यावेळी तेथे आणखी सहा बिबटे ठेवण्यासाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जेरबंद चार मादी बिबटे व ब्रम्हपुरी वन विभागातील अवघ्या वष्रेभराच्या बिबटय़ाला भोपाळमध्ये ठेवण्यावर वनखात्यात गांभीर्याने विचार सुरू आहे.
ब्रम्हपुरी वन विभागातील बिबटय़ा घोट सिंदेवाही परिसरात आईपासून विभक्त झाल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या कारणावरून ४ जूनला ब्रम्हपुरी वन विभागात आणण्यात आले. या बिबटय़ाला दोन बिबटय़ांसह पाठविण्यात आले नाही. भोपाळच्या उद्यानाची पाहणी करून जागा उपलब्ध आहे का याबाबत चौकशी केली असता आणखी सहा बिबटे राहू शकतात, असे सांगण्यात आले.
यामुळे ताडोबातील चार मादी बिबटे व ब्रम्हपुरीतील एक, अशा पाच बिबटय़ांना तिकडे पाठवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या पाच बिबटय़ांना तेथे सोडले तर स्थानिक वन अधिकाऱ्यांना मोकळीक मिळणार आहे. त्यामुळेच हा निर्णय तातडीने व्हावा, असे काही वनाधिकारी बोलून दाखवित आहेत. ताडोबातील जेरबंद बिबटय़ांमध्ये एक बिबटय़ा तर आता वृध्दावस्थेकडे झुकलेला आहे. त्याला जंगलात सोडले, तर वाघ किंवा बिबटय़ाच त्याची शिकार करण्याची शक्यता आहे. तसेच अन्य बिबटय़ांनाही मायक्रोचिप लावून जंगलात सोडले, तर ते धुमाकूळ घालण्याची शक्यता अधिक आहे. कारण, यातील दोन बिबटय़ांना मानवी रक्ताची चटक लागली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊनच ताडोबा व्यवस्थापन व चंद्रपूर वन विभागाने पाचही बिबटय़ांना राष्ट्रीय वन विहारात सोडण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. या प्रस्तावाला वन्यजीव विभागाने मंजुरी प्रदान करताच तातडीने पाचही बिबट भोपाळला स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.