राज्यात सत्तेवर आलेले युतीचे सरकार कोकणच्या विकासासाठी पंचवार्षिक आराखडा तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.
गुहागर तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील श्री पद्मावती देवी मंदिराचा कलशारोहण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाला. या प्रसंगी ते म्हणाले की, आंबा बागायत किंवा मच्छिमारीबरोबरच पर्यटन हा कोकणच्या विकासाचा कणा होऊ शकतो. त्या दृष्टीने युती सरकारने पावले टाकायला सुरवात केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प नुकताच मार्गी लावण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात असलेल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या आधारे ऐतिहासिक पर्यटनाचा विकास होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या पर्यटनाधारित विकास आराखडय़ाला आर्थिक बळ देऊन कोकण पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. दुर्दैवाने आतापर्यंत त्याबाबत चर्चाच झाली. पण युती सरकारच्या मंत्रिमंडळाची मुंबईबाहेरील पहिली बैठक कोकणात घेण्यात येणार आहे. या बैठकीत कोकणचा पाच वष्रे मुदतीचा विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक नैतिक, आर्थिक आणि शासकीय पाठबळ दिले जाईल.
कोकणात भरपूर पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता येथेही जलसंधारण व पुर्नभरणाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
यंदाच्या मोसमात कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला अवकाळी पावसाचा फटका लक्षात घेऊन कशा स्वरूपाची नुकसान भरपाई देता येईल, याबाबतचा अहवाल कृषि आयुक्तांना तयार करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो सादर झाल्यानंतर लगेच निर्णय घेतला जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार मधू चव्हाण यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. झी २४ तास या वृत्तवाहिनीचे संपादक उदय निरगुडकर आणि तालुक्याचे आमदार भास्कर जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रभावहीन दौरा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस गुरुवारी प्रथमच कोकणच्या दौऱ्यावर आले. एखाद्या मंदिराच्या जिर्णोध्दार व कलशारोहण समारंभाला मुख्यमंत्र्यांनी येण्याचा कोकणातील हा पहिलाच कार्यक्रम असावा. माजी मंत्री भास्कर जाधव यांनीही त्याबाबत आपल्या भाषणात चिमटा काढला. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. वसंतराव भागवत आणि जनसंघाचे माजी आमदार कै. तात्यासाहेब नातू यांचे मार्गताम्हाणे हे मूळ गाव असल्यामुळे संघाच्या मुशीत वाढलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा, असे मानले जाते. अर्थात केवळ खासगी स्वरूपाचा दौरा होऊ नये म्हणून तालुक्यातील जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येत असलेल्या मळण या गावाला मुख्यमंत्र्यांची भेट आयोजित करून या दौऱ्याला ‘शासकीय’ स्वरूप देण्यात आले. मात्र मूळ कार्यक्रमच त्या पदाला न शोभणारा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पहिलाच कोकण दौरा प्रभावहीन ठरला.