जायकवाडी जलाशयात गेल्या काही दिवसांपासून रशिया, सबेरिया, तिबेट व उत्तर युरोपातून हजारो किलोमीटर प्रवास करून आलेले विदेशी पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. पांढरा स्वच्छ, देखणा तीन-साडेतीन फूट उंचीचा फ्लेिमगो, बदकांच्या विविध जाती, अणकुचीदार शेपटीचा पिनटेल, चपटी चोच व हिरवे डोके असणारा शॉवेलर या पक्ष्यांची संख्या मोठी आहे. जायकवाडीत तुलनेने अधिक पाणी असल्याने निरीक्षणासाठी हे वर्ष अधिक नयनमनोहारी असेल, असे पक्षिमित्र दिलीप यार्दी यांना वाटते.
जायकवाडी जलाशय पक्ष्यांसाठी विशेष पाणथळ म्हणून घोषित व्हावा, यासाठी प्रयत्न करणारे यार्दी पक्ष्यांचे जग अक्षरश: उलगडून दाखवतात. युरोपात कडाक्याची थंडी पडते. बर्फामुळे त्यांचे खाद्यच संपते, तेव्हा त्यांचे स्थलांतर सुरू होते. मध्य आशियातून, उत्तर युरोपातून ८४-८५ प्रकारचे पक्षी दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी, सुखना येथे येतात. त्यातील फ्लेिमगो हा पक्षी कमालीचा देखणा आहे. त्याची चोच एक प्रकारची गाळणी असते. तो दलदलीत पाय नाचवितो. त्यामुळे गाळातील किडे वर येतात. खोऱ्यासारख्या चोचीने तो गाळ वर घेतो. गाळ बाजूला पडतो आणि तो कीटक खातो. गुलाबी पायाचा फ्लेिमगो पक्षिमित्रांसाठी नेहमीच कौतुकाचा विषय असतो. अणकुचीदार शेपूट असणारा पिनटेल, शॉवेलर, ब्लॅक िवग स्टील, पानकावळा, सॅन्डपाईपर, लिटरसिन्ट, ग्रीन श्ॉक, रेड श्ॉक असे किती तरी प्रकारचे पक्षी जायकवाडीच्या वास्तव्यास आले आहेत.
जायकवाडीत १८ प्रकारची बदके येतात. जेवढे बदक अधिक तेवढी पाण्याची शुद्धता अधिक. जलाशयात अमाप वाढणारी वनस्पती ते खातात. शेवाळ कमी होते. जायकवाडी धरण बशीच्या आकाराचे आहे. तुलनेने ते उथळ मानले जाते. त्यामुळे विविध खाद्य वनस्पती या पाणवठय़ावर आहेत. विदेशी पक्षी व स्थानिक असा वाद पक्ष्यांमध्ये नसतो. कारण प्रत्येकाची अन्नसाखळी निराळी असते. वेगवेगळ्या पाणीपातळीत ते खाद्यपदार्थ शोधत असतात. पक्ष्यांची संख्या अधिक असल्याने काही शिकारी पक्षीही जायकवाडीत येतात. गरुड जातीतील ऑस्प्रे नावाचा पक्षी याच दिवसात येतो. त्याची छाती पांढरी असते व त्यावर काळ्या रंगाची रांगोळी असते. असे पक्षी पाहण्याचा आनंद नोव्हेबर व डिसेंबरमध्ये घेता येऊ शकतो.
काही पक्षी पिकांवरील अळी खाणारेही आहेत. रफ अॅण्ड रिव्ह नावाचा पक्षी हरभऱ्यावर पडणारी घाटी अळी खातो. बार हेडेड गुज या बदकापेक्षा मोठय़ा पक्ष्याच्या डोक्यावर दोन काळ्या रंगाच्या रेघा असतात. पक्षी ओळखण्याच्या या खुणा सापडल्या की नव्याने पक्षी निरीक्षणासाठी गेलेला माणूस अधिक सुखावतो. हा काळ नव्या पाहुण्यांच्या कौतुकाचा असल्याने पक्षीप्रेमींच्या आनंदाला भरते आले आहे.
पक्षीओळख
फ्लेमिंगो – तीन-साडेतीन फूट उंच. पांढरा स्वच्छ रंग. गुलाबी पंख. पायही गुलाबी. पाण्यात पटकन लक्ष वेधून घेतो. देखणा-उमदा पक्षी.
बार हेडेड गूज – स्थानिक बदकापेक्षा थोडासा मोठा. करडा रंग. डोक्यावर दोन काळ्या रेघा.
शॉवेलर – नर जातीच्या पक्ष्याचे डोके  हिरवेगार. चोच चपटी फावडय़ाच्या आकाराची.
गारगेनी – पांढऱ्या रंगाची भुवई.