गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे चिपळुणात वाशिष्ठी नदीला तर खेडमध्ये जगबुडीसह चोरद नदीला पूर आला. चिपळूणमध्ये भरलेले पाणी रात्री उशिरा ओसरल्याने नुकसान झाले नाही. मात्र जगबुडी, चोरद नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेत घुसल्याने व्यापाऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी जगबुडी पुलावरून वाहिल्याने, पुराचे कठडेही तुटले. खेड तालुक्यात पुराच्या पाण्यात मोटारसायकलवरील एक व्यक्ती वाहून गेली. या व्यक्तीचा शोध सुरू आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सकाळी आठ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर चिपळुणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी पी. प्रदीप यांनी काल चिपळूण व खेड येथील परिस्थितीची पाहाणी केली व अधिकाऱ्यांना खेडमधील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

चिपळूण तालुक्यात गेल्या ४८ तासात सव्वादोनशे मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर खेडमध्ये अडीचशे मि.मी. पाऊस कोसळला. यामुळे दोन्ही तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

गुरुवारी सायंकाळी वाशिष्ठी व खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. रात्री आठ वाजल्यानंतर चिपळूण व खेड शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. चिपळूण शहरामध्ये रात्री १२ वाजेपर्यंत पाणी भरले होते. शहरातील नदीकिनारी भागात प्रामुख्याने पाणी भरले होते. मात्र मध्यरात्री पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. खेड शहरामध्ये मात्र जगबुडीसह चोरद नदीचे पाणी घुसल्याने बाजारपेठेत १० ते १२ फूट उंचीचे पाणी घुसले होते. यामुळे शहरातील सर्व दुकाने पाण्याखाली गेली होती.

एवढे पाणी भरेल याची कल्पना नसल्याने, व्यापारी वर्गाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रांताधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी या परिस्थितीकडे लक्ष ठेवून होते. नुकसानग्रस्त घरे व व्यापाऱ्यांचे पंचनामे तातडीने व्हावेत यासाठी तालुक्यातील सर्व तलाठय़ांना खेडमध्ये बोलाविण्यात आले होते.

खेडमध्ये बहिरवली येथील सुधीर भोसले नावाची व्यक्ती मोटारसायकलवरून घरी परतत असताना, चोरद नदीवरील पुलावरून पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेली.

खेड बाजारपेठेबरोबरच जगबुडी नदीवरील महामार्गाचा पूलही रात्री ८ वाजल्यानंतर पाण्याखाली गेल्याने महामार्ग रात्री ९ वाजल्यापासून बंद करण्यात आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कऱ्हाड, कोल्हापूरमार्गे वळविण्यात आली होती.

अवजड वाहने मात्र उशिरापर्यंत चिपळूण शहरात व महामार्गावर ठिकठिकाणी पार्किंग करण्यात आली होती. सकाळी ८ वाजता जगबुडी पुलाची पाहणी करून हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. याच दरम्यान, महामार्गावर परशुराम घाटामध्ये दगड खाली आल्याने वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली होती. शुक्रवारी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी महाडचे उपकार्यकारी अभियंता गायकवाड, चिपळूणचे उपकार्यकारी अभियंता सोनावणे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते.