केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे हे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबात अतिशय जागरूकतेने काम करणारे आहे. राज्यातील  फडणवीस सरकारने जलयुक्त शिवारसारखी अभिनव योजना आणि महाकर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या केवळ आजच्या भल्याचाच विचार केला नाही तर भविष्याचा देखील विचार केला आहे. शाश्वत विकासावर या सरकारचा भर असून याचे दृष्यपरिणाम लवकरच दिसून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कार्यक्रमामध्ये जिल्हय़ातील ३१ शेतकरी दाम्पत्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व दिवाळी निमित्त भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. ऐनदिवाळीमध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात असल्याचा आनंद आहे. यासाठी राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे अभिनंदन करतो, अशा शब्दात शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर आमदार अ‍ॅड. संजय धोटे, किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जिल्हा उपनिबंधक आर.डी. कौसडीकर, खुशाल बोंडे उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार अ‍ॅड. धोटे, भांगडिया यांचीही भाषणे झाली. ज्या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय नावे पुढील प्रमाणे आहे. ब्रम्हपुरी तालुका-अशोक मोहुर्ले, कोरपना-अशोक मंगाम, राजुरा-राजया बेडकमवार, गोंडपिंपरी-अनिल चौधरी, भाऊजी ठुसे, भद्रावती-गणपत साव, प्रवीण गेडाम, गजानन घोटकर, बल्लारपूर-पुंजाराम सोयाम, पोंभूर्णा-भाऊजी मडावी, सुनील लोणारे, दिलीप दिवसे, सावली-राजु मुप्पावार, शामराव मोहुर्ले, चिमूर-वासुदेव दोडके, विलास वाघाडे, मूल-रामप्रसाद गेडाम, सखाराम सिडाम, बोडकू मडावी, वरोरा-रविंद्र उरकुडे, अनंता घागी, चंद्रपूर-प्रभाकर पाचभाई, प्रकाश पारपल्लीवार, नागभीड-शांता श्रीरामे, रघुनाथ कन्नाके, मंगेश गुरनुले, सिंदेवाही-आनंदराव लोखंडे, प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे. तर अनुपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे रामदास करंबे, सुधाकर ताजणे, शंकर पवार अशी आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशुतोष सलिल यांनी केले. संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार जिल्हाउपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी मानले. यावेळी जिल्हय़ातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बळीराजाला दिवाळीची भेट

गडचिरोली जिल्हय़ातील शेती संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असून कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. या अडचणीतून सोडविण्यासाठी कर्जमुक्त करण्याचा शासनाने संकल्प करून या साडेतीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण झाली. आज दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने कर्जमाफी करून दिवाळी गोड केली. सिंचनाची सुविधा करण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न करून सिंचनाची सुविधा करून येथील शेतकरी समृध्द करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते २४ शेतकरी बांधवांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.